I League : अपराजित चर्चिल ब्रदर्सला खुणावतोय करंडक

I League : अपराजित चर्चिल ब्रदर्सला खुणावतोय करंडक
ISL

पणजी : गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अपराजित कामगिरी बजावली. आता त्यांना विजेतेपदाचा करंडक खुणावत आहे. त्या मोहिमेत शुक्रवारी (ता. 5) कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर रियल काश्मीर संघाविरुद्ध त्यांचा सामना होईल.

चर्चिल ब्रदर्सने आय-लीग स्पर्धेत दहापैकी सहा सामने जिंकताना 22 गुणांची कमाई केली. त्यांचे दुसऱ्या क्रमांकावरील पंजाब एफसीपेक्षा चार गुण, तर रियल काश्मीरपेक्षा पाच गुण जास्त आहेत. काश्मीरच्या संघाविरुद्ध पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यास आय-लीग स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकण्याची चर्चिल ब्रदर्सची शक्यता बळावेल. मात्र सामना चुरशीचा ठरण्याचे संकेल आहेत. पहिल्या टप्प्यात रिलय काश्मीरने फक्त एक सामना गमावला. उभय संघांतील लढत गोलशून्य बरोबरीत राहिली होती.

चर्चिल ब्रदर्सचे परदेशी आघाडीपटू होंडुरासचा क्लेव्हिन झुनिगा आणि स्लोव्हेनियाचा लुका मॅसेन जोमदार फॉर्ममध्ये आहेत. स्पेनचे फर्नांडो व्हारेला यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची शुक्रवारी या जोडगोळीवर मदार राहील. मेसन रॉबर्टसन, लुकमन आदेफेमी हे रियल काश्मीरचे प्रमुख खेळाडू आहेत.

रियल काश्मीरकडून प्रतिहल्ला अपेक्षित आहे, त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे, असे चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक व्हारेला यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. चर्चिल ब्रदर्सविरुद्धचा सामना अवघड असल्याचे रियल काश्मीरचे प्रशिक्षक डेव्हिड रॉबर्टसन यांनी मान्य केले, तरीही आपला संघ दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेस विजयाने सुरवात करण्यास इच्छुक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दृष्टिक्षेपात...

- पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्सचे 6 विजय, 4 बरोबरी

- रियल काश्मीरचे पहिल्या टप्प्यात 4 विजय, 5 बरोबरी, 1 पराभव

- रियल काश्मीरचे 18, तर चर्चिल ब्रदर्सचे 15 गोल

- चर्चिल ब्रदर्सच्या लुका मॅसेनचे 7, क्लेव्हिन झुनिगाचे 6 गोल

- रियल काश्मीरच्या मेसन रॉबर्टसन व लुकमन आदेफेमी यांचे प्रत्येकी 5 गोल

- चर्चिल ब्रदर्सच्या 6, तर रियल काश्मीरच्या 4 क्लीन शीट्स

- पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्स-रियल काश्मीर सामना 0 - 0 बरोबरीत

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com