९ जानेवारीपासून रंगणार आय-लीग

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

कोरोना विषाणू महामारीमुळे २०२०-२१ मोसमातील आय-लीग फुटबॉल स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात ९ जानेवारीपासून कोलकात्यात खेळली जाईल. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी सर्व संघांना चौदा दिवस अगोरद जैवसुरक्षा वातावरणात प्रवेश करावा लागेल.

पणजी : कोरोना विषाणू महामारीमुळे २०२०-२१ मोसमातील आय-लीग फुटबॉल स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात ९ जानेवारीपासून कोलकात्यात खेळली जाईल. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी सर्व संघांना चौदा दिवस अगोरद जैवसुरक्षा वातावरणात प्रवेश करावा लागेल.

स्पर्धेत एकूण अकरा संघांचा समावेश आहे. यामध्ये गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाचाही समावेश आहे. कोलकात्यातील मोहम्मेडन स्पोर्टिंगने ऑक्टोबरमध्ये द्वितीय विभागीय स्पर्धा जिंकून यंदा आय-लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे, तर दिल्लीच्या सुदेवा एफसी संघास थेट प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. गतमोसमातील विजेता मोहन बागान संघाचे एटीके संघात विलनीकरण झाले असून ते यंदा आयएसएल स्पर्धेत खेळतील. कोलकात्यातील आणखी एक आय-लीग संघ ईस्ट बंगालही आगामी आयएसएल स्पर्धेत खेळणार आहे.

नव्या स्वरुपात स्पर्धा

कोविड-१९ मुळे यंदा स्पर्धा नव्या स्वरूपात होईल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सर्व अकरा संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. नंतर गुणतक्त्यातील क्रमवारीनुसार संघांची दोन गटात विभागणी होईल. पहिले सहा संघ एका गटात असतील. त्यांच्या एकेरी पद्धतीने सामने होतील आणि विजेत्या संघाची निश्चिती होईल. या गटातील संघ पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून १५ सामने खेळतील. गुणतक्त्यातील बाकी पाच संघ दुसऱ्या गटात असतील. 
 

संबंधित बातम्या