
Virat Kohli: भारत विरुद्ध श्रीलंका संघात मंगळवारी वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला होता. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवला. या विजयात विराट कोहलीने मोठा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 113 धावांची शतकी खेळी केली होती.
या सामन्यातून विराटने नव्यावर्षाची दमदार सुरुवात केली आहे. त्याची गेल्या 2 वर्षात कामगिरी खालावली होती. पण त्याने 2022 वर्षाच्या अखेरीस काही चांगल्या खेळी करत त्याचा फॉर्म परतल्याचे सिद्ध केले होते. त्यातच त्याने आता 2023 वर्षाच्या सुरुवातीलाच शतक करत त्याचा चांगला फॉर्म कायम असल्याचे सांगितले आहे.
पण, ज्यावेळी त्याची कामगिरी खालावली होती, त्यावेळी त्याची मनस्थितीही चांगली नसल्याचे त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवशी बोलताना मान्य केले आहे.
विराट म्हणाला, 'माझ्याबाबतीत निराशा होती. मी विक्षिप्त वागत होतो आणि चिडचिड करत होतो. माझी पत्नी अनुष्कासाठी आणि माझ्या जवळच्या लोकांसाठी, मला पाठिंबा देणाऱ्या लोकांसाठी हे योग्य नव्हते. त्यामुळे मला जबाबदारी घेणे आणि गोष्टी योग्य ठेवणे गरजेचे होते.'
'मी माझ्या क्रिकेटपासून खूप दूर होतो. माझ्या आसक्ती, माझ्या इच्छा पूर्णपणे संपल्या होत्या. पण त्याचवेळी मला जाणवले की मी कोण आहे, यापासून मी दूर जाऊ शकत नाही. मला माझ्या स्वत:शी प्रामाणिक राहाणे गरजेचे आहे. अगदी मी कितीही वाईट वागत असलो, चांगले खेळत नसलो आणि जगातील वाईट खेळाडू असलो तरी मला ते स्विकारणे महत्त्वाचे होते. मी काहीही नाकारू शकत नव्हतो.'
(I was very cranky says Virat Kohli on his poor run of form)
त्याचबरोबर विराट असेही म्हणाला की 'कधीकधी असे होते सूर्या तू सुद्धा जसजसा खेळत जाशील, तसा तुला अनुभव येईल की लोक तुझ्याकडे वेगळ्याप्रकारे बघतात. तू जेव्हा खेळायला जाशील, तेव्हा लोक म्हणतील, सूर्या हे करेल. या अपेक्षा सांभाळणे कठीण असते.'
'जेव्हा तुम्ही क्रिकेट चांगले खेळत असता, तेव्हा या सर्व गोष्टी चांगल्या होतात. पण जेव्हा तुमच्या कामगिरी थोडी खालावते, तेव्हा माझ्याबाबतीत निराशा रेंगाळू लागली. कारण मला एका प्रकारे क्रिकेट खेळायचे होते. पण माझा खेळ आधीसारखा होत नव्हता.'
विराटने नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला. त्याने म्हटले की 'मी आनंदी आहे. गेल्या दोन वर्षात मला अशी सुरुवात मिळाली नव्हती. वर्षातील माझा हा पहिला सामना होता आणि मी शतक केले. आशा आहे की मी ही लय कायम ठेवेल. कारण यावर्षात वर्ल्डकप होणार आहे. तसेच आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाची कसोटी मालिकाही खेळायची आहे.'
तो पुढे म्हणाला, 'जेव्हा तुम्ही कोणत्याही सामन्यात धावा करतो, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. मी आनंदी आहे की मी जवळपास संपूर्ण डावात फलंदाजी केली. मी आनंदी असून पुढेही खेळण्यास उत्सुक आहे.'
विराटने गेल्यावर्षी आशिया चषकापूर्वी काही दिवस विश्रांती घेतली होती. त्यानंतर त्याने आशिया चषकात जवळपास 1000 दिवसांनंतर शतक केले होते.
याबद्दल विराट म्हणाला, 'जेव्हा मी आशिया चषकात परत आलो, तेव्हा मी रिलॅक्स होतो. मी सरावाची मजा पुन्हा घ्यायला लागलो होतो. मी असेच क्रिकेट आधीपासून खेळले आहे. त्यामुळे मी हेच सांगेल की जेव्हा तुम्हाला थोडीशीही निराशा वाटेल, तेव्हा स्वत:वर ताण देण्यापेक्षा दोन पावले मागे जा.'
दरम्यान, विराट कोहलीच्या नावावर आता 73 आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद झाली आहे. यात 45 वनडे शतकांचा समावेश आहे. त्यामुळे तो येणाऱ्या काळात सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 वनडे शतकांचा विक्रम मोडू शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.