''विराट कोहलीच्या आगमनामुळे भारतीय संघ बुलेटप्रूफ झाला आहे'' 

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ आता इंग्लंडसोबत चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका चेन्नईत 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ आता इंग्लंडसोबत चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका चेन्नईत 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी टीम इंडियाचा संघ आपला फेवरेट असल्याचे सांगत, भारतीय संघ हा इंग्लंडपेक्षा सरस ठरणार असल्याचे म्हटले आहे. इंग्लंड संघाकडे वेगवान मारा आहे. मात्र, भारतीय संघाकडे पाहुण्या इंग्लंड संघापेक्षा चांगली टॉप ऑर्डर असल्याचे इयान चॅपेल यांनी म्हटले आहे. 

भारतीय संघाबद्दल एका कॉलम मध्ये लिहिताना इयान चॅपेल यांनी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकणार्‍या भारतीय संघाची फलंदाजी विराट कोहलीच्या आगमनाने आणखी मजबूत झाली असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये सर्व अडचणींमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या आगामी मालिकेत टीम इंडिया आपल्यासाठी फेवरेट संघ राहणार असल्याचे इयान चॅपेल यांनी सांगितले आहे. याशिवाय जर विराट कोहलीचे नाव भारतीय संघात समाविष्ट केले तर, या संघाने बुलेटप्रूफ जॅकेट घातल्याचे वाटते, असे इयान चॅपेल म्हणाले आहेत.       

याशिवाय, आर अश्विन, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांचा भारतीय संघात प्रवेश झाल्यानंतर हा संघ पुन्हा अनबिटेबल दिसत असल्याचे इयान चॅपेल यांनी या लेखात म्हटले आहे. त्यानंतर टीम इंडियाची टॉप ऑर्डर अधिकच मजबूत असल्यामुळे हा संघ आपला पसंतीचा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. इंग्लंडच्या संघाने भलेही श्रीलंकेच्या संघाला त्यांच्याच मायदेशात 2 - 0 ने क्लीन स्वीप दिली असली तरी, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यामुळे भारताची बॅटिंग लाईनअप इंग्लंडपेक्षा मजबूत असल्याचे इयान चॅपेल यांनी पुढे आपल्या लेखात म्हटले आहे. तसेच अजिंक्य रहाणे, रिषभ पंत यांच्यामुळे भारताचा संघ अधिक संतुलीत असल्याचे इयान चॅपेल यांनी अधोरेखित केले आहे. 

याव्यतिरिक्त, हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन झाले असल्यामुळे भारताची फलंदाजी अधिक बलाढ्य झाल्याचे इयान चॅपेल यांनी सांगितले आहे. भारतीय गोलंदाजी धारदार आणि प्रभावी असल्याचे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत देखील पाहायला मिळाले होते. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध चांगली सुरवात करण्यास मदत मिळणार असल्याचे इयान चॅपेल यांनी आपल्या या लेखात म्हटले आहे. 

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. तर त्यानंतरचे दोन सामने अहमदाबाद येथील नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्याचे नियोजन आहे. व चेन्नई येथे होणाऱ्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियम जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.      

संबंधित बातम्या