बंगळूरसाठी महत्त्वाचा सामना; चेन्नईयीनला नमविल्यास प्ले-ऑफ फेरीची संधी कायम

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीच्या कामगिरीत सातत्य नाही.

पणजी ः माजी विजेत्या बंगळूर एफसीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत चेन्नईयीन एफसीला हरवून पूर्ण तीन गुणांची कमाई केल्यास त्यांना प्ले-ऑफ फेरीची संधी राहील. बाकी पाचही सामने त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. उभय संघांत शुक्रवारी  फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सामना खेळला जाईल.

बंगळूरचे 15 लढतीतून 18, तर चेन्नईयीनचे तेवढ्याच सामन्यातून 16 गुण आहेत. अंतरिम मुख्य प्रशिक्षक नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला सामना जिंकताना बंगळूरने मागील लढतीत ईस्ट बंगालला हरविले. तब्बल आठ सामने त्यांना स्पर्धेतील एकंदरीत चौथ्या विजयासाठी वाट पाहावी लागली. अकरा लढतीनंतर त्यांनी क्लीन शीट राखली. ईस्ट बंगालविरुद्धचा फॉर्म कायम राखल्यास बंगळूर चेन्नईवर वर्चस्व राखू शकेल. शुक्रवारी विजयी कामगिरी केल्यास ते पहिल्या चार संघांत जागा मिळविण्यासाठी वेशीवर येतील.

I-League 2021: पिछाडीवरून मुंबई सिटी विजयी

साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीच्या कामगिरीत सातत्य नाही. आक्रमणही तेवढे धारदार नाही. स्पर्धेत सर्वांत कमी अकरा गोल चेन्नईच्या संघाने नोंदविले आहेत. गतसामन्यात त्यांना हैदराबादकडून दोन गोलनी पराभव स्वीकारावा लागला होता. मागील चार लढतीतून त्यांनी फक्त दोन गुणांची कमाई करताना केवळ एकच गोल नोंदविला आहे. बंगळूरला सूर गवल्यामुळे चेन्नईयीनच्या बचावफळीस सावध राहावे लागेल. पहिल्या टप्प्यात त्यांच्यावर बंगळूरने सुनील छेत्रीच्या पेनल्टी गोलमुळे मात केली होती.

 

दृष्टिक्षेपात...

- प्रत्येकी 15 लढतीनंतर बंगळूरचे 4, तर चेन्नईयीनचे 3 विजय

- स्पर्धेत बंगळूरचे 19, तर चेन्नईयीनचे 11 गोल

- बंगळूरच्या क्लेटन सिल्वा व सुनील छेत्री यांचे प्रत्येकी 5 गोल

- चेन्नईयीनच्या 5, तर बंगळूरच्या 3 क्लीन शीट्स

- चेन्नईयीनच्या स्पर्धेत 5 गोलशून्य बरोबरी

 

संबंधित बातम्या