ISL 2020-21: प्ले-ऑफसाठी एफसी गोवा आणि बंगळूरसाठी महत्त्वाचा सामना

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

एफसी गोवा आणि बंगळूर एफसी सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्ले-ऑफ फेरीसाठी प्रयत्नशील आहेत.

पणजी ः एफसी गोवा आणि बंगळूर एफसी सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्ले-ऑफ फेरीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यात रविवारी (ता. 21) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर लढत होईल, तेव्हा दोन्ही संघांवर तीन गुणांच्या कमाईचा दबाव असेल.

सध्या हैदराबाद एफसी (+8), एफसी गोवा (+7) व नॉर्थईस्ट युनायटेड (+3) या संघांचे प्रत्येकी 27 गुण आहेत आणि ते अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. प्ले-ऑफ फेरीतील बाकी दोन जागांसाठी या तीन संघात जास्त चुरस आहे. बंगळूर एफसी सध्या सहाव्या क्रमांकावर असून त्यांच्या खाती 22 गुण आहेत. रविवारी नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने विजय मिळविल्यास त्यांनाही प्ले-ऑफ फेरीच्या शर्यतीत कायम राहता येईल. हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने पूर्ण तीन गुणांची कमाई केल्यास बंगळूर संघाचे आव्हान संपुष्टात येईल. अगोदरच्या लढतीत मुंबई सिटीस नमविल्यामुळे बंगळूरला आशा कायम राखता आल्या.

ISL 2020-21 : एटीके मोहन बागानचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालवर मोसमात सलग...

‘‘सामन्यातील तीन गुण आमच्यासाठी, तसेच प्रतिस्पर्ध्यांसाठीही खूप महत्त्वाचे आहेत,’’ असे फेरांडो यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. बंगळूरचा संघ सेटपिसेसवर गोल करण्यात पटाईत आहे आणि या व्यूहरचनेत एफसी गोवाचा बचाव ढेपाळतो हे स्पर्धेत वारंवार घडले आहे. आपल्या संघाची ही कमजोरी फेरांडो यांना मान्य आहे. ‘‘सेटपिसेसवर नियंत्रण राखण्यासाठी आम्ही सरावात मेहनत घेत आहोत,’’ असे ते म्हणाले. संघातील नवा गोलरक्षक वीस वर्षीय धीरज सिंग अजून एफसी गोवाच्या शैलीत रुळलेला नाही. मात्र या युवा गोलरक्षकाची फेरांडो यांनी पाठराखण केली.

सामना महत्त्वाचा असला, तरी संघावर अजिबात दबाव नाही आणि प्रशिक्षकांनी फुटबॉलचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आहे, असे एफसी गोवाचा मध्यरक्षक प्रिन्सटन रिबेलो याने सांगितले.

गोवा अकरा सामने अपराजित

एफसी गोवा संघ स्पर्धेत सलग 11 सामने अपराजित आहे. रविवारी त्यांनी बंगळूरला नमविले किंवा बरोबरीत राखले, तर गोव्याचा संघ विक्रमाशी बरोबरी साधेल. 2015 साली एफसी गोवानेच, तर यंदा मुंबई सिटीने सलग 12 सामन्यात हार पत्करली नव्हती. मागील लढतीत एफसी गोवाने सलग सहा बरोबरीनंतर ओडिशा एफसीला पराजित केले होते. पहिल्या टप्प्यात त्यांचा बंगळूरविरुद्धचा सामनाही बरोबरीत राहिला होता.

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाची कामगिरी ः 18 सामने, 6 विजय, 9 बरोबरी, 3 पराभव, 27 गुण

- बंगळूर एफची कामगिरी ः 18 सामने, 5 विजय, 7 बरोबरी, 6 पराभव, 22 गुण

- 11 अपराजित सामन्यांत एफसी गोवाचे 4 विजय, 7 बरोबरी

- स्पर्धेत एफसी गोवाचे सर्वाधिक 29 गोल, बंगळूरचे 23 गोल

- प्रतिस्पर्ध्यांचे एफसी गोवावर 22, तर बंगळूरवर 23 गोल

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे 17 लढतीत 12 गोल

- एफसी गोवाच्या आल्बर्टो नोग्युएरा याचे स्पर्धेत सर्वाधिक 8 असिस्ट

- आमने-सामने ः 8 लढती, बंगळूरचे 5, तर एफसी गोवाचा 1 विजय, 2 बरोबरी

- पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे 2-2 गोलबरोबरी

संबंधित बातम्या