‘ट्रेनिंग अखेर सुरू झाले हेच महत्त्वाचे’: दीपा कर्माकर

वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

जिम्नॅस्टिकसारख्या खेळात सरावात एका आठवड्याचा खंडही चालत नाही; मात्र कोरोनाचा खेळांना खूपच मोठा फटका बसला. लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन ट्रेनिंग सुरू होते; तसेच तंदुरुस्तीकडेही लक्ष दिले होते. - दीपा कर्माकर

मुंबई: चार वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यातच रिओ ऑलिंपिकमध्ये दीपा कर्माकरने लक्षवेधक कामगिरी केली होती. त्यामुळे तिला पदक जिंकण्याचीही संधी निर्माण झाली होती. आता चार वर्षांनी दीपाला आपले ट्रेनिंग सुरू झाले, याचे समाधान आहे. तब्बल साडेपाच महिन्यांनी दीपाचा सराव सुरू झाला आहे.

 

कोरोनामुळे अंमलात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी असलेली तंदुरुस्ती पुन्हा मिळवणे, हे सध्या माझे प्राथमिक लक्ष्य आहे, असे दीपाने सांगितले. त्रिपुरा सरकारने नेताजी सुभाष विभागीय प्रशिक्षण केंद्र इनडोअर सरावासाठीही खुले केल्यामुळे दीपाचा सराव सुरू झाला. पुन्हा एकदा जिम्नॅस्टिकसाठी असलेल्या साहित्यांना स्पर्श झाला. या स्पर्शाने सरावापासून दीर्घ कालावधीसाठी दूर होतो, ही निराशा काहीशी दूर झाली, असे तिने सांगितले.

 

पाच महिन्यांपासून अगदी नेमके सांगायचे झाले, तर १६ मार्चपासून सराव बंद होता. या कालावधीत घरात थांबावे लागले होते. क्रीडा साहित्यापासून खेळाडू दूर होतो, त्या वेळी तो कमालीचा निराश होतो. बिश्वेश्वर नंदी सरांनी मला ऑनलाईन मार्गदर्शन केले. आता तंदुरुस्तीबरोबरच लॉकडाऊनपूर्वीचा स्तर गाठणे हे माझे लक्ष्य आहे. हे जेवढ्या लवकर साध्य होईल, तेवढा पुढील खडतर सराव लवकर सुरू होईल, असे तिने सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या