IndiavsAustralia T20 Series: सामना हरलो; मात्र मालिका जिंकलो

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

भारताला आजच्या सामन्यात जिंकण्यासाठी १८७ धावांचे लक्ष्य मिळाले. कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची अप्रतिम खेळी केली मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. भारताने निर्धारित २० षटकांमध्ये १७४ धावा केल्या.

कॅनबेरा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १२ धावांनी पराभव केला. मात्र, भारताने याआधीच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत मालिका जिंकली आहे. भारताला आजच्या सामन्यात जिंकण्यासाठी १८७ धावांचे लक्ष्य मिळाले. कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची अप्रतिम खेळी केली मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. भारताने निर्धारित २० षटकांमध्ये १७४ धावा केल्या.

 भारताने १८७ धावांचा पाठलाग करताना सुरूवातीलाच राहूलची विकेट गमावली. त्यानंतर शिखर आणि विराट यांनी ७४ धावांची भागीदारी रचली. धावगती वाढवण्याच्या नादात शिखर बाद झाला. हार्दिक पांड्याने यानंतर फलंदाजीला येत दोन जोरदार फटके लगावले मात्र, तो सुद्धा संघाला विजयापर्यंतर पोहोचवू शकला नाही. विराट कोहली आज यंदाच्या वर्षातील पहिलं शतक साजरं करणार असं वाटत असतानाच तो बाद झाला. त्याने ६१ चेंडूंमध्ये ८५ धावा केल्या. शार्दूल ठाकूरने शेवटी सुरेख फटके लगावले मात्र, तोवर संघ हारल्यात जमा होता. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू मिशेल स्वेप्सनने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्यासाठी त्याला सामनावीराचा किताबही देण्यात आला. झम्पा, अबॉट आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. 

 याआधी नाणेफेक हारल्यावर डावाची सुरूवात करताना ऑस्ट्रेलियाने आपला कर्णधार फिंच याला लवकर गमावले. त्यानंतर वेड आणि स्मिथ यांनी सावध खेळ करत संघाला समाधानकारक स्थितीत आणून सोडले. वेडने सर्वाधिक ८० धावा केल्या. मॅक्सवेलने त्याला उत्तम साथ देत डावाच्या शेवटी धावगती वाढवत संघाला निर्णायक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याने ५४ धावांची खेळी केली. स्मिथनेही २४ धावांचे योगदान दिले. भारताकडून सुंदर आणि शार्दूल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर नटराजनला एक गडी बाद करता आला. 

सामनावीर- मिशेल स्वेप्सन
मालिकावीर- हार्दिक पांड्या 

संबंधित बातम्या