'वर्ल्ड कप'चे आयोजन करणे भारतासाठी गौरवास्पद

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० क्रिकेट स्पर्धेचे संयोजन भारतीय क्रिकेट मंडळासाठी गौरवास्पद बाब आहे, असे मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले.

दुबई :  विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० क्रिकेट स्पर्धेचे संयोजन भारतीय क्रिकेट मंडळासाठी गौरवास्पद बाब आहे, असे मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले. पुढील वर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारतातील या स्पर्धेचे काऊंटडाऊन आजपासून सुरू झाले. 

भारतातील या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दिवसाच्या एक वर्ष अगोदर हे काऊंटडाऊन सुरू करण्यात आले. विश्‍वकरंडक स्पर्धा यजमानपद ही अभिमानास्पद बाब आहे. भारताने १९८७ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून अनेक स्पर्धांचे यशस्वी संयोजन केले आहे. भारतातील या स्पर्धेत खेळण्यास जगभरातील क्रिकेटपटू नक्कीच उत्सुक असतील, असे गांगुली यांनी सांगितले.

विश्‍वकरंडक तसेच आयसीसीच्या  स्पर्धेत यापूर्वी माझा सहभाग एक खेळाडू म्हणून होता. जगातील क्रिकेट रसिकांचे या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याकडे लक्ष असते. या स्पर्धेत माझा प्रशासक म्हणून सहभाग असेल, असेही त्यांनी नमूद केले.

पुढील वर्षी दिवाळीच्या सुमारास ही विश्‍वकरंडक स्पर्धा होणार आहे. ऑस्ट्रेलियातील विश्‍वकरंडक महिला ट्‌वेंटी २० स्पर्धेच्या अंतिम सामन्यास ८६ हजार १७४ चाहते उपस्थित होते. त्यानंतरची ही पहिलीच विश्‍वकरंडक स्पर्धा असेल. ऑस्ट्रेलियात यंदा ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये होणारी विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा २०२२ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. भारतातील स्पर्धेत सोळा संघांचा सहभाग 
असेल. 

विश्‍वकरंडक स्पर्धेतील संघ : अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नामिबिया, नेदरलॅंडस्‌, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज.

संबंधित बातम्या