प्रतिकूल परिस्थितीतही भारताकडून चीन चेकमेट
India thrash China to enter quarter final in Online Chess championship

प्रतिकूल परिस्थितीतही भारताकडून चीन चेकमेट

मुंबई: वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यामुळे इंटरनेट यंत्रणा बंद पडण्याची धास्ती या मानसिक दडपणाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने चीनला ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये हार मानण्यास भाग पाडले. भारताने ४-२ बाजी मारत स्पर्धेच्या थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

स्पर्धेच्या आठव्या फेरीत भारताने जर्मनीस ४.५-१.५ असे नमवून चीनवरील दडपण वाढवले होते. भक्ती कुलकर्णी, विदित गुजराथी, वंतिका अगरवालच्या विजयामुळे भारताने ही लढत जिंकली. भारतासमोर खरे आव्हान चीनचे होते. या लढतीतीलस भारतीय खेळाडूंपेक्षा चिनी खेळाडूंचे जागतिक मानांकन सरस होते; पण भारतीयांनी नेटाने खेळ करीत विजय मिळवला. भारताने जॉर्जियाला ४-२ हरवून चांगली सुरुवात केली होती. 

विदित गुजरातीने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आमचे कुमार खेळाडू ट्रम्प कार्ड ठरू शकतात, असे सांगितले होते. चीनविरुद्धच्या सामन्यात नेमके हेच घडले. विदित, हरिकृष्ण, कोनेरू हंपी आणि द्रोणावली हरिका या वरिष्ठ खेळाडूंच्या लढती बरोबरीत सुटल्या; पण आर. प्रग्नानंधा याने त्याच्यापेक्षा सरस मानांकन असलेल्या लिऊ यान याला हरवले. नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुखने चीनची महिला ग्रॅंडमास्टर जिनेर झिऊ हीचा पाडाव केला. दिव्याचे (१,७७५) जागतिक मानांकन झिउपेक्षा (२,३२६) कमी आहे. काळी मोहरे असतानाही दिव्याने चमकदार विजय मिळवत भारतास यशस्वी केले.

खेळाडूंना सुविधा देणार
मंगोलियाविरुद्धच्या लढतीच्या वेळी विदित गुजराती आणि कोनेरू हंपीस खंडित वीजपुरवठ्यामुळे इंटरनेटचा प्रश्न आला आणि पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या दोन्ही गटांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतसिंग चौहान तसेच विजय देशपांडे या प्रतिस्पर्धी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंची गरज पूर्ण करण्यास महासंघ सदैव तयार आहे, असे सांगितले.

दीर्घ कालावधीनंतर सरशी
भारताने २००६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना चीनला हरवले होते. त्यानंतर क्वचितच महत्त्वाच्या स्पर्धेत भारताने चीनला हरवले. चार वर्षांपूर्वी अबूधाबीतील आशियाई सांघिक स्पर्धेत भारताने चीनला पराजित केले होते, याकडे काही अभ्यासकांनी लक्ष वेधले. 

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com