
India vs Australia, 3rd Test at Indore: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच काही दिवसांपूर्वी चार सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. मात्र, या मालिकेतील इंदूरला पार पडलेल्या तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वाईट रेटिंग दिले होते. पण आता आयसीसीने हा निर्णय बदलला आहे.
आयसीसीने वाईट रेंटिंग देण्याबरोबरच इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमला 3 डिमीरिट पाँइंट्स दिले होते. पण बीसीसीआयने या निर्णयाच्या विरुद्ध अपील केले होते. त्यामुळे आयसीसीच्या अपील पॅनलने या निर्णयाची पुन्हा तपासणी केली. त्यानंतर आता वाईटवरून (Poor) सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता असलेली (Below Average) खेळपट्टी असे रेटिंग देण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या अपीलनंतर आयसीसीच्या दोन सदस्ययी पॅनलने या प्रकरणाची चौकशी केली असून या पॅनेलमध्ये आयसीसीचे जनरल मॅनेजर वासिम खान आणि आयसीसी पुरुष क्रिकेट कमिटीचे सदस्य रॉजर हार्पर यांचा समावेश होता.
या दोघांनीही समीक्षेनंतर असे मत नोंदवले की खेळपट्टी तपासणी प्रक्रियेच्या परिशिष्ट ए नुसार सामनाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक तत्त्वे पाळली होती. पण खेळपट्टीला वाईट रेटिंग देण्यासाठी इतकीही अनियमित उसळी नव्हती.
त्यामुळे या पॅनलने इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलले असून डिमीरिट पाँइंट्सही कमी करण्यात आले आहे. आता बदलेल्या निर्णयानुसार तीन ऐवजी एकच डिमीरिट पाँइंट्स होळकर स्टेडियमला लागू होईल.
आयसीसीच्या नियमांनुसार खेळपट्ट्यांना 6 प्रकारात रेटिंग दिले जाते. यामध्ये खूप चांगली (Very Good), चांगली (Good), सामन्य (Average), सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता असलेली (Below Average), वाईट (Poor), अयोग्य (Unfit) अशा 6 प्रकारचे रेटिंग दिले जाते.
यामध्ये सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता असलेली, वाईट आणि अयोग्य अशा रेटिंग मिळालेल्या खेळपट्ट्यांच्या स्टेडियमला डिमिरिट पाँइंट दिले जातात. आयसीसीच्या नियमानुसार पाच वर्षांच्या कालावधीत जर एकाद्या ठिकाणाचे 5 डिमिरिट पाँइंट्स झाले, तर त्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्यासाठी 12 महिन्यांची बंदी घालण्यात येते.
इंदूरला झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ अडीच दिवसात भारताविरुद्ध विजय मिळवला होता. या खेळपट्टीवर सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. सामन्याच्या पहिल्याच दिवशी एकूण 14 विकेट्स गेल्या होत्या.
तसेच या सामन्यात गेलेल्या 31 विकेट्सपैकी 26 विकेट्स फिरकीपटूंनी काढल्या होत्या, तर 4 विकेट्स वेगवान गोलंदाजांना मिळाल्या होत्या. तसेच एक विकेट रनआऊटच्या रुपात गेली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.