
India vs Australia, 4th Test : अहमदाबाद येथे होत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेचा रविवारी (12 मार्च) चौथ दिवस होता. या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 षटकात बिनबाद 3 धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी भारताचा पहिला डाव 178.5 षटकात 571 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने 91 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने 186 धावांची खेळी केली, त्यापूर्वी शुभमन गिलनेही 128 धावांची खेळी केली, तर अक्षर पटेलनेही अर्धशतक करताना 79 धावांची खेळी केली.
या सामन्यात चौथ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 100 व्या षटकापासून आणि 3 बाद 289 धावांपासून खेळायला सुरुवात केली. यावेळी विराट कोहली नाबाद 59 आणि रविंद्र जडेजा 16 धावांवर खेळत होते. या दोघांनीही चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजा 107 व्या षटकात टॉड मर्फीविरुद्ध खेळताना उस्मान ख्वाजाकडे झेल देत 28 धावांवर बाद झाला.
पण त्यानंतर केएस भरतने विराटची चांगली साथ दिली. या दोघांनीही 84 धावांची भागीदारी केली. यादरम्यान भरतने काही चांगले शॉटही खेळले. मात्र, त्याची खेळी नॅथन लायनने संपवली. भरतने 88 चेंडूत 44 धावा केल्या.
भरतनंतर अक्षर पटेल फलंदाजीला आला. त्याने देखील विराटला चांगली साथ देण्यास सुरुवात केली. दरम्यान, विराटने 241 चेंडूत 139 व्या षटकात त्याचे कसोटी क्रिकेटमधील 128 वे शतक पूर्ण केले. त्याने शतकानंतर त्याच्या धावांची गती वाढवली.
दरम्यान अक्षरनेही काही सुरेख फटके मारताना या मालिकेतील तिसरे अर्धशतक ठोकले. पाहाता पाहाता अक्षर आणि विराट यांची दीडशतकी भागीदारी झाली. त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलेच दमवले. अखेर मिशेल स्टार्कने ही जोडी 173 व्या षटकात तोडली. त्याने अक्षरला 79 धावांवर त्रिफळाचीत केले.
यानंतर मात्र, भारताची तळातली फळी फार काळ टिकू शकली नाही. अश्विन 7 धावांवर बाद झाला, तर उमेश शुन्यावर धावबाद झाला. अखेर मर्फीने 179 व्या षटकात विराटला बाद करत भारताचा डाव संपवली. विराटने 364 चेंडूत 186 धावांची खेळी केली.
दरम्यान, भारताकडून श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे फलंदाजीसाठी आला नाही. हा सामना सुरू असताना त्याच्या पाठीत वेदना होत असल्याने त्याला स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आले होते.
भारताच्या पहिल्या डावात नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिशेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 480 धावा केल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.