सुनिल गावस्कर म्हणाले.. 'विराट'च्या अनुपस्थितीत रहाणेची प्रशंसा केली, तर म्हणतील मुंबई कनेक्‍शन मुळे कौतुक'

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 27 डिसेंबर 2020

रहाणेच्या नेतृत्वशैलीबाबत विचारले असता गावसकर म्हणाले, मी तर त्याचे कौतुक केले, तर मुंबईचा खेळाडू म्हणून गावसकर त्याचे कौतुक करत आहेत, असे म्हटले जाईल. त्यामुळे मी काहीच बोलणार नाही.

मुंबई : ऑस्ट्रलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला ; पण त्याचबरोबर अजिंक्‍य रहाणेच्या नेतृत्वाचेही कौतुक झाले. रहाणेच्या नेतृत्वशैलीबाबत विचारले असता गावसकर म्हणाले, मी तर त्याचे कौतुक केले, तर मुंबईचा खेळाडू म्हणून गावसकर त्याचे कौतुक करत आहेत, असे म्हटले जाईल. त्यामुळे मी काहीच बोलणार नाही. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्या वेळी त्याचे कौतुक झालेले आहे. आजही रहाणेने आपल्या नेतृत्वशैलीची छाप पाडली. क्षेत्ररक्षण व्यूहरचना आणि गोलंदाजीत त्याने केलेले बदल यशस्वी ठरले. 

मार्नस लाबूशेन आणि ट्रॅव्हिड हेड यांची जोडी जमलेली असताना त्याने बुमराला गोलंदाजीस आणले आणि ही जोडी फोडली. पदार्पण करणाऱ्या महम्मद शिराजचाही रहाणेने कल्पकतेने वापर करून त्याचाही आत्मविश्‍वास वाढवला. या संदर्भात गावसकर यांना विचारले असता त्यांनी सावध पवित्रा घेतला. तो मुंबईचा खेळाडू असल्याने गावसकर त्याचे अधिक कौतूक करतील, असे म्हटले जाईल, असे ते म्हणाले. तसेच काही सामन्यातच तो नेतृत्व करत आहे. त्यामुळे इतक्‍या लवकरही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे सांगत गावसकरांनी सुवर्णमध्य काढला. दोन कसोटी सामने आणि एक एकदिवसीय सामन्यात नेतृत्व करताना मी रहाणेला पाहिले आहे. क्षेत्ररक्षक कोठे उभे करायचे, याची चांगली जाण त्याला आहे; पण क्षेत्ररक्षण रचनेनुसार गोलंदाजी करणे हे गोलंदाजांचे काम आहे. आज या दोन्ही गोष्टी जुळून आल्या, असे गावसकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या