ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताचा 13 धावांनी निसटता विजय

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 डिसेंबर 2020

येथील मनुका ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांमध्ये 302 धावांचा डोंगर उभारला. याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मात्र २८९ धावाच करता आल्या.

कॅनबेरा- ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळलेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 13 धावांनी पराभूत केले आहे. येथील मनुका ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांमध्ये 302 धावांचा डोंगर उभारला. याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मात्र २८९ धावाच करता आल्या.

सुरूवातीपासून चांगली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने शेवटी आपले ४ फलंदाज फक्त २१ धावांमध्ये गमवून सामना भारताला बहाल केला. मात्र, मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये जिंकून ऑस्ट्रेलियाने याआधीच मालिका खिशात घातली आहे. भारताने आज ऑस्ट्रेलियातील यंदाचा आपला पहिला विजय नोंदवून आगामी टी-ट्वेंटी आणि कसोटी मालिकेसाठी चांगले संकेत दिले आहेत.  

विशेष म्हणजे कॅनबेरा येथील भारताचा हा एकदिवसीय सामन्यांमधील पहिलाच विजय आहे. याआधी भारताने या मैदानावर दोन सामने खेळले होते. मात्र, त्या सामन्यांमध्ये भारताला हार मानावी लागली होती. तिकडे ऑस्ट्रेलियाने या मैदानावर एकूण चार सामने खेळताना एकही सामन्यात हार मानलेली नाही. आज पहिल्यांदा त्यांना हारचा सामना करावा लागला आहे. 

या सामन्यात निसटता विजय मिळवणाऱ्या भारतीय संघातील हार्दिक पांड्याला सामनावीर ठरवण्यात आले. त्याने 76 चेंडूंवर नाबाद 92 धावा केल्या. रविंद्र जडेजाबरोबर त्याने रचलेली भागीदारी भारताला निर्णायक अवस्थेत घेऊन आली. जडेजाने ५० चेंडूंमध्ये नाबाद ६६ धावांची खेळी केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली. मयंक अग्रवालच्या जागी संधी देण्यात आलेला शुभमन गिलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने धवनबरोबर सलामीला येत ३३ धावा केल्या.  राहूल ५,  अय्यर १९,  शिखर १६, तर कर्णधार कोहलीने 78 चेंडूंमध्ये 63 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. 

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार फिंचने संघाला चांगली सुरूवात करून देत 82 चेंडूंमध्ये 75 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करताना संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून  सोडले मात्र, त्याला विजय मिळवून देण्यात अपयश आले. त्याने ३८ चेंडूंमध्ये ५९ धावांची खेळी केली. त्याला अॅलेक्स कॅरीने ३८ धावा करत मोलाची साथ दिली. 
 

संबंधित बातम्या