
India Women vs South Africa Women: गुरुवारी भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या तीन महिला क्रिकेट संघांमध्ये तिरंगी टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना भारतीय महिला संघ विरुद्ध यजमान दक्षिण आफ्रिकन महिला संघात बफेलो पार्क, इस्ट लंडन येथे पार पडला.
या सामन्यात भारतीय संघाने 27 धावांनी विजय मिळवला. भारतासाठी या सामन्यातून पदार्पण करणारी अमनज्योत कौरने संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यामुळे तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही देण्यात आला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पण भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताने 69 धावातच 5 विकेट्स गमावल्या होत्या.
दरम्यान, सुरुवातीला एका बाजूने विकेट जात असताना यास्तिका भाटियाने एक बाजू सांभाळली होती. पण तीही तिला मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकली नाही. ती 35 धावा करून बाद झाली.
सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा डाव दिप्ती शर्मा आणि अमनज्योतने सांभाळला. त्यांनी काही आक्रमक फटके खेळताना 6 व्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदार रंगली असतानाच दिप्ती अखेरच्या षटकात बाद झाली. पण त्यांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ 20 षटकात 6 बाद 147 धावा करू शकला.
दिप्तीने 23 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 33 धावांची खेळी केली, तर अमनज्योतने 30 चेंडून नाबाद 41 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 7 चौकार ठोकले. पण या सामन्यात भारताकडून स्मृती मानधना (7), जेमिमाह रोड्रिग्ज (0), हरलीन देओल (8) आणि देविका वैद्य (9) दोन आकडी धावसंख्याही पार करू शकले नाहीत.
दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको एलाबाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच मॅरिझेन केप, आयाबोंगा खाका आणि डेलमी टकर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकात 9 बाद 120 धावाच करता आल्या. दिप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी भारताला सुरुवातीलाच यश मिळवून दिले होते. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीला खेळायला आलेल्या लॉरा वॉलवार्ड आणि ऍनेक बोश या झटपट बाद झाल्या.
पण, त्यानंतर मॅरिझेन कॅप आणि कर्णधार सुन ल्यूसने डाव सांभाळायचा प्रयत्न केला. पण त्या दोघीही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर बाद झाल्या. त्यांच्याव्यतिरिक्त क्लो ट्रायॉनने 26 धावांची खेळी केली. या तिघींव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही.
भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच देविका वैद्यने 2 विकेट्स घेतल्या, तर राधा यादव, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी एक विकेट घेतली.
या तिरंगी मालिकेतील भारतीय महिला क्रिकेट संघाचा पुढील सामना 23 जानेवारी रोजी वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.