INDvsENG : अश्विनच्या फिरकीसमोर पाहुणा इंग्लंडचा संघ ढेपाळला; पहिल्या डावात टीम इंडियाची आघाडी  

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या चेपक मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज भारतीय संघाच्या गोलंदाजांनी कमाल करत पाहुण्या इंग्लंडच्या संघाला चांगलाच धक्का दिला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या चेपक मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज भारतीय संघाच्या गोलंदाजांनी कमाल करत पाहुण्या इंग्लंडच्या संघाला चांगलाच धक्का दिला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावा केल्यानंतर इंग्लंडच्या संघाला 134 धावांवर रोखण्याचा पराक्रम केला आहे. आणि यासोबतच टीम इंडियाने पहिल्या डावात इंग्लंडच्या संघावर 195 धावांची आघाडी मिळवली आहे. 

IND Vs ENG : 'शेन वॉर्न'ची अजब भविष्यवाणी; "टिम इंडिया...

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने सहा गडी गमावून  300 धावसंख्येच्या पुढे खेळण्यास चालू केले. यानंतर भारतीय संघ 95.5 षटकात 329 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपल्या धारदार गोलंदाजीसह चांगलेच अडचणीत आणल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सला इशांत शर्माने खातेही  उघडू दिले नाही. रोरी बर्न्सला इशांत शर्माने शून्य धावांवर पायचीत केले. त्यानंतर डॉम सिब्लेला रविचंद्रन अश्विनने 16 धावांवर बाद करून भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. अश्विनने त्याला विराट कोहली करवी झेलबाद केले. 

त्यानंतर मागील सामन्यात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या जो रूटला अक्षर पटेलने झेलबाद करून भारतीय संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. जो रूट फक्त सहा धावांवर असताना अश्विनने त्याचा झेल पकडला. पुढे लॉरेन्सला अश्विनने 9 धावांवर शुभमन गिल करवी झेलबाद केले. यानंतर बेन स्टोक्स 18 धावांवर असताना अश्विनने त्याला बोल्ड केले. तर ओली पोपला मोहम्मद सिराजने बाद केले. पोप 22 धावांवर असताना मोहम्मद सिराजने त्याला रिषभ पंत करवी झेलबाद केले. पोप आऊट झाल्यानंतर इंग्लंड संघाचे उर्वरित खेळाडू झटपट बाद झाले. मात्र बेन फॉक्स नाबाद राहिला. त्याने 107 चेंडूंचा सामना करत एका चौकारासह 42 धावा केल्या. 

दरम्यान, पहिल्या डावात गोलंदाजी करताना भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स रविचंद्रन अश्विनने घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच बळी टिपले. तर इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने केलेली दीड शतकी खेळी आणि अजिंक्य राहणे व रिषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावसंख्या उभारली. रोहित शर्माने 231 चेंडूंचा सामना करताना 161 धावा केल्या. यावेळेस त्याने दोन षटकार आणि 18 चौकार खेचले. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला असून, सलामीवीर रोहित शर्मा (20) आणि शुभमन गिल (12) मैदानावर खेळत आहेत.        

संबंधित बातम्या