रशियात जिंकलेल्या ऑलिंपियाड सुवर्णपदकासाठी बुद्धिबळपटूंना भरावे लागले सीमाशुल्क

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

भारतीय संघाने ऑगस्टमध्ये बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये संयुक्त विजेतेपद जिंकले, त्याबद्दल सर्वांनीच संघावर कौतुकाचा वर्षाव केला. चीनला साखळी लढतीत पराजित केल्याने या यशाची सुवर्णझळाळी वाढली होती, पण आता याच यशामुळे मिळालेल्या सुवर्णपदकासाठी भारतीयांना सीमाशुल्क भरणे भाग पडले आहे.

नवी दिल्ली :   भारतीय संघाने ऑगस्टमध्ये बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये संयुक्त विजेतेपद जिंकले, त्याबद्दल सर्वांनीच संघावर कौतुकाचा वर्षाव केला. चीनला साखळी लढतीत पराजित केल्याने या यशाची सुवर्णझळाळी वाढली होती, पण आता याच यशामुळे मिळालेल्या सुवर्णपदकासाठी भारतीयांना सीमाशुल्क भरणे भाग पडले आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाने भारतीय संघातील खेळाडूंची सुवर्णपदके कुरियरने पाठवली, पण भारतीयांना ही प्राप्त होण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली, तसेच सीमाशुल्कही भरावे लागले. 

भारतीयांची सुवर्णपदके रशियाहून तीन दिवसांतच भारतात आली होती. नोव्हेंबरमध्ये बंगळूरला दाखल झालेली ही सुवर्णपदके आठ दिवसांनी आम्हाला मिळाली. बंगळूरला २३ नोव्हेंबरला पोहोचलेली सुवर्णपदके चेन्नईस २ डिसेंबरला आली. यासाठी शिवाय सीमाशुल्क द्यावे लागले, असे ट्‌विट भारतीय संघाचा उपकर्णधार श्रीनाथ नारायणन याने केले आहे. 
ही सुवर्णपदके सोडवून घेण्यासाठी मला अनेक कागदपत्रे सादर करावी लागली. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ते पॅकेज उघडून मला आतमध्ये काय आहे. ही पदके कशाची तयार होतात, अशी विचारणा केली. यासंदर्भातील सर्व अधिकृत कागदपत्रच नव्हे तर पदके कशी तयार होतात, त्यात काय असते याचीही माहिती द्यावी लागली. त्यानंतर हे पॅकेज कुरियरद्वारे माझ्याकडे आले, त्यावेळी सीमाशुल्कासाठी ६ हजार ३०० रुपयेही घेण्यात आले, असे त्याने सांगितले. 

केंद्र सरकारच्या २०१७ मधील निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक, तसेच करंडकावर सीमाशुल्क माफ आहे, याकडे लक्ष वेधल्यावर नारायणनने सुवर्णपदकात सोनेच नसते. पदकांना सोन्याचा मुलामा दिलेला असतो, याकडे लक्ष वेधले. दरम्यान, बंगळूर येथील सीमाशुल्क अधिकारी ए. के. ज्योतीश यांनी सीमाशुल्क परत करण्याची तयारी दाखवली आहे. अर्थात जागतिक बुद्धिबळ महासंघाने यापूर्वीच ही सुवर्णपदके घरापर्यंत पोहोचवण्याचा सर्व खर्च करण्याची तयारी दाखवली आहे.

 

अधिक वाचा ;

आयएसएल बंगळूर अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत ; आज चेन्नईयीन एफसी विरूद्ध मिळणार संधी 

एटीके मोहन बागानचा इंज्युरी टाईमच्या शेवटच्या मिनिटास गोल; ओडिशाची एका गोलने हार

संबंधित बातम्या