हॅपी बर्थडे चिकू....क्रिकेटची भाषाच बदलून टाकणारा 'कॅप्टन'

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

भारतीय संघाच्या तीनही प्रकारच्या क्रिकेटमधील या कर्णधाराचा आज ३२वा जन्म दिवस. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्मलेल्या या कलात्मक फलंदाजाने वयाच्या १९व्या वर्षीच श्रीलंकेविरूद्ध दाम्बुलामध्ये आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली आणि अजूनही त्याने मागे वळून पाहिले नाही.

नवी दिल्ली- आधुनिक क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये गणला जाणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली. फिटनेसला खेळात किती महत्व आहे, हे जगाला पटवून देऊन त्याने क्रिकेट या खेळात नवी परंपरा घालून दिली. भारतीय संघाच्या तीनही प्रकारच्या क्रिकेटमधील या कर्णधाराचा आज ३२वा जन्म दिवस. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्मलेल्या या कलात्मक फलंदाजाने वयाच्या १९व्या वर्षीच श्रीलंकेविरूद्ध दाम्बुलामध्ये आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली आणि अजूनही त्याने मागे वळून पाहिले नाही.    

भारतासाठी 86 कसोटी सामने खेळणाऱ्या विराटने कसोटी क्रिकेटमध्येही आपली आक्रमक शैली कायम ठेवत संघाला एका उंचीवर पोहोचवून ठेवले आहे. त्याने २४८ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले असून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वकालीन खेळाडूंपैकी एक असलेल्या या खेळाडूने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ११०००च्या वर एकदिवसीय धावा आपल्या नावावर जमा असणाऱ्या विराटची तीनही प्रकारच्या क्रिकेटमधील सरासरीही 50च्या वर आहे.  

2011 साली विश्वचषक आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक मोठा भाग होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या हातून कर्णधारपदाची सुत्रे आपल्या हाती घेतलेल्या विराटने मागे वळून पाहिलेच नाही. त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक सामन्यांवर शिक्का मारला. याशिवाय भारतीय फॅन्सचे ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही त्याने पूर्ण करून दिले. मात्र, विश्वचषकाने त्याला जवळ जाऊन हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात त्याने विश्वचषकावर नाव कोरावे या सदिच्छा.   
  

संबंधित बातम्या