
Hockey World Cup 2023: शुक्रवारपासून हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हॉकी वर्ल्डकपचे हे 15 वे पर्व असून भारत यंदा यजमान आहे. भारतातील ओडिशा राज्यात ही स्पर्धा खेळवली जात आहे. दरम्यान, यजमान भारतीय हॉकी संघाकडून सर्वच भारतीय चाहत्यांना विश्वविजेतेपदाची अपेक्षा आहे. या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाला भारतभरातून सध्या शुभेच्छा दिल्या जात आहे.
भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये अनेक आजी-माजी भारतीय क्रिकेटपटू देखील आहेत. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हॉकी संघाला शुभेच्छा देताना लिहिले आहे की 'हॉकी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाला शुभेच्छा. आम्ही सर्व तुम्हाला पाठिंबा देत आहोत. चक दे.'
तसेच विराट कोहलीने लिहिले, 'आपल्या भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपसाठी माझ्या शुभेच्छा. जा आणि मजा घ्या. आम्ही सर्वच तुम्हाला पाठिंबा देत आहोत. गुडलक.'
याबरोबरच केएल राहुलने लिहिले की 'सर्व खेळाडूंना शुभेच्छा. आशआ आहे की स्पर्धेत धमाकेदार कामगिरी कराल.'
याशिवाय देखील हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, सुरेश रैना, जेमिमाह रोड्रिग्स, मुनाफ पटेल अशा अनेक क्रिकेटपटूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
(Indian Cricket Fraternity wishes best luck to Indian Hockey Team)
दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची भारताला संधी
भारतीय संघाने यापूर्वी 1975 साली हॉकी वर्ल्डकप पहिल्यांदा जिंकला होता. त्यानंतर गेल्या 48 वर्षात भारताला वर्ल्डकपवर नाव कोरता आलेले नाही. त्याचमुळे यावेळी विश्वविजेतेपदाचा हा 48 वर्षांचा दुष्काळ घरच्या चाहत्यांसमोर संपवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
भारतीय संघ गेल्या काही काळापासून चांगली कामगिरीही करत आहे. त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून चार दशकांची ऑलिम्पिक पदकाची प्रतिक्षा संपवली होती.
तसेच गेल्यावर्षी राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत भारताने रौप्य पदक जिंकले होते. त्यामुळे भारतीय संघाची गेल्या दोन वर्षातील ही कामगिरी पाहून सर्वांना वर्ल्डकपमध्येही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
वर्ल्डकपपूर्वीच भारतीय संघावर बक्षीसांची उधळण
या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विश्वविजेतेपद जिंकल्यास संघातील प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाहीर केले आहे. तसेच हॉकी इंडियानेही भारतीय संघासाठी बक्षीस जाहीर केले आहे.
हॉकी इंडियाकडून भारतीय संघाने या वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला 25 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफ सदस्याला 5 लाख रुपये देण्यात येतील.
तसेच रौप्य पदक जिंकले, तर प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना 3 लाख रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर कांस्य पदक मिळवले, तर प्रत्येक खेळाडूला 10 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला 2 लाख रुपये देण्यात येतील.
डोळे दिपवणारा उद्घाटन सोहळा
कटकमधील बाराबाती स्टेडियममध्ये बुधवारी हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यासाठी जवळपास 50 हजारांहून अधिक चाहते उपस्थित होते. तसेच रणवीर सिंग, दिशा पटानी, निती मोहन, प्रीतम यांसारख्या अनेक मोठमोठ्या सेलिब्रेटिंच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा रंगला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.