टिम इंडिया ऑस्ट्रेलियात, रोहित मायदेशीच

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

आयपीएलच्या अंतिम सामन्यात निर्णायक अर्धशतकी खेळी केलेल्या रोहित शर्माविनाच अखेर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियास रवाना झाला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार केल्यानंतरच रोहित कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियास जाणार आहे. 

दुबई / नवी दिल्ली :  आयपीएलच्या अंतिम सामन्यात निर्णायक अर्धशतकी खेळी केलेल्या रोहित शर्माविनाच अखेर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियास रवाना झाला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार केल्यानंतरच रोहित कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियास जाणार आहे. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बुधवारी दुबईहून सिडनीस रवाना झाला आहे. मात्र त्याचवेळी रोहितला मायदेशी परतावे लागले आहे. आयपीएलमधील पंजाबविरुद्धच्या लढतीच्यावेळी (१८ ऑक्‍टोबर) रोहितला दुखापत झाली होती. त्यानंतर तो चार सामने खेळला नाही. याच दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या भारताच्या एकाही संघात रोहितची निवड झाली नव्हती. मात्र मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन केल्यानंतर त्याची काही दिवसांतच कसोटी संघात नव्याने निवड करण्यात आली. 

भारतीय संघ २७ नोव्हेंबर ते १९ जानेवारीदरम्यान ऑस्ट्रेलियात तीन ट्‌वेंटी, तीन एकदिवसीय लढती, तसेच चार कसोटी खेळणार आहे. यातील मर्यादित षटकांच्या लढतीच्यावेळी रोहित बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेणार आहे. तेथील पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो तसेच इशांत शर्मा कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियास रवाना होतील. त्यापूर्वी दोघांचीही तंदुरुस्त चाचणी होईल. 
ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून होणार आहे. पहिली कसोटी अॅडलेडला प्रकाशझोता आहे. त्यापूर्वीचे सक्तीचे १४ दिवसांचे विलगीकरण लक्षात घेतल्यास रोहित, इशांत या महिनाअखेर ऑस्ट्रेलियास रवाना होण्याची शक्‍यता 
आहे.

वृद्धिमान साहा ऑस्ट्रेलियास रवाना?
केवळ कसोटीसाठी निवडलेला वृद्धिमान साहा याला आयपीएलच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो सलग दोन सामन्यांना मुकला होता. रोहित शर्मा उपचारासाठी मायदेशी परतत असताना साहा मात्र ऑस्ट्रेलियास रवाना झाला आहे. त्याच्या दोन्ही मांड्यांचे स्नायू दुखावले असल्याचे सांगण्यात आले होते.

स्वागतास केवळ सुरक्षा रक्षक

भारतीय क्रिकेटपटूंच्या परदेश दौऱ्यावर उत्साहात स्वागत होते. चाहते विमानतळ, हॉटेलजवळ गर्दी करतात. जोरजोरात ओरडून प्रोत्साहन देतात. मात्र भारतीय संघ सिडनीत दाखल झाला, त्यावेळी फक्त सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिसांनी चौकोनी चेहऱ्याने संघाचे स्वागत केले.

भारतीय संघाचा सिडनीतील मुक्काम निसर्ग सुंदर सिडनी हार्बरच्या परिसरातील हॉटेलात असतो. या वेळी सिडनी ऑलिंपिक पार्क जवळच्या पुलमन हॉटेलात संघ १४ दिवस विलगीकरणात राहणार आहे. हे हॉटेल शहरापासून दूर आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर संघाचा सराव सुरू होईल. ते मैदान हॉटेलपासून दूर 
आहे. 

आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना अगोदरच विलगीकरणाचा उबग आला आहे. त्यातच आखातातून थेट ऑस्ट्रेलियाला यावे लागले असल्याने खेळाडू एकमेकांना दिलासा देत आहेत. चौदा दिवसांच्या अतिरिक्त विलगीकरणासाठी स्वतःला तयार करीत आहेत. त्याचवेळी खेळाडूंना भेटणे तर सोडाच सरावही पाहता येणार नसल्याने स्थानिक चाहते नाराज आहेत.

संबंधित बातम्या