भारताने दारूण पराभवानंतर पुन्हा केली सरावाला सुरूवात; विराटच्या अनुपस्थितीत कोणाला मिळेल संधी?

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

टीम इंडियाने नाताळनंतर दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी नेट प्रॅक्‍टिस सुरू केली. या दुसऱ्या कसोटीत कोणाकोणाला संधी मिळणार याचे संकेत सरावाच्या पहिल्याच दिवशी मिळाले.

मेलबर्न- ॲडलेड येथील दारुण पराभवाची मरगळ झटकून नव्या उमेदीने टीम इंडियाने नाताळनंतर दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी नेट प्रॅक्‍टिस सुरू केली. या दुसऱ्या कसोटीत कोणाकोणाला संधी मिळणार याचे संकेत सरावाच्या पहिल्याच दिवशी मिळाले.

हा दुसरा सामना ‘बॉक्‍सिंग डे’ म्हणजेच २६ तारखेला सुरू होत आहे. ॲडलेडमधील मानहानीकारक कामगिरीनंतर पुढच्या तीन दिवसांत भारतीयांनी मनोबल उंचावले आणि आजपासून प्रत्यक्ष सराव सुरू केला. शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत यांना दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्‍यता आज त्यांना सरावात मिळालेल्या प्राधान्यावरून दिसून आली.

डे-नाईट सराव सामन्यात ४३ आणि ६५ धावांची खेळी करूनही पहिल्या सामन्यात संधी न मिळालेल्या शुभमन गिलने दुसरा सलामीवीर मयांक अगरवालसह नेटमध्ये सुरुवातीलाच फलंदाजी केली. पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून सहा चेंडू टिकलेल्या आणि दोन्ही वेळा त्रिफाळाचीत झालेल्या पृथ्वी शॉऐवजी गिलला संधी मिळणार हे जवळपास निश्‍चित होत आहे.

विराट कोहली मायदेशी परतलेला असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केएल राहुल अंतिम संघात खेळणार हे निश्‍चित आहे; मात्र त्याचा क्रमांक कोणता असेल यावर निर्णय झालेला नाही. राहुलला सलामीला खेळवा असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे. फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल नेटमध्ये सराव करत होता. राठोड पृथ्वी शॉबरोबरही संवाद साधताना दिसून आला.

संबंधित बातम्या