नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे २०२० हे वर्ष जवळपास वाया गेल्यानंतर २०२० या वर्षात भारताचे क्रिकेट पूर्णपणे ‘अनलॉक’ होत असून विराट कोहली आणि टीमसाठी एक महिन्याचाही उसंत मिळणार नाही. क्रिकेटएके क्रिकेट हाच पाढा त्यांना म्हणावा लागणार आहे.
भारतीय क्रिकेट मंडळाकडून अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नसला, तरी जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षांत भारतीय संघ १४ कसोटी, १६ एकदिवसीय आणि २३ ट्वेन्टी-२० सामने याशिवाय आयपीएल तसेच जून महिन्यात आशिया कप ट्वेन्टी-२० आणि ऑक्टोबर महिन्यात मायदेशात ट्वेन्टी-२० विश्वकरंडक असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जानेवारीत हा संघ मायदेशी परतेल. त्यानंतर मायदेशात दोन महिन्यांची इंग्लंडविरुद्धची मालिका होणार आहे. यात चार कसोटी, चार एकदिवसीय आणि चार ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे. ही मालिका संपताच मार्च ते मे महिन्याचा पूर्वार्ध यात आयपीएलचा १४ वा हंगाम होणार आहे.
आयपीएलनंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल. तेथून जूनच्या मध्यावर मायदेशी परतेल. त्यानंतर जुलै महिन्यात आशिया कप स्पर्धेत सहभागी होईल. या दौऱ्यानंतर जुलै छोटेखानी झिम्बाब्वे दौरा होणार आहे; मात्र त्यासाठी नवोदितांचा संघ पाठवला जाण्याची शक्यता आहे.
जुलै ते सप्टेंबर इंग्लंड दौरा
जुलै ते सप्टेंबर या दोन महिन्यांत भारतीय संघ प्रतिष्ठेच्या इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महत्त्वाची असणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खेळल्यानंतर भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे.
२०२२ आणि २०२३ सुद्धा हाऊसफूल्ल-
२०२१ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी हाऊसफुल्ल असले, तरी २०२२ आणि २०२३ या वर्षांतील कार्यक्रमही भरगच्च आहे. २०२२ ची सुरवात मायदेशातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेने होणार आहे. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धची मायदेशातील मालिका, न्यूझीलंड दौरा, त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात आयपीएल. जुलै महिन्यात पुन्हा इंग्लंड दौरा; परंतु या वेळी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी. वेस्ट इंडिज दौरा, सप्टेंबरमध्ये आशिया कप २०२२. त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेन्टी- २० विश्वकरंडक.
नोव्हेंबरमध्ये बांगलादेश दौरा आणि डिसेंबरमध्ये मायदेशात श्रीलंकेविरुद्धची मालिका. हा सर्व २०२२ चा कार्यक्रम असेल. २०२३ ची सुरुवात मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने होईल. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया भारतात येणार आहे. एप्रिल-मे महिन्यात आयपीएल झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये भारतात ५०-५० षटकांची विश्वकरंडक स्पर्धा अपेक्षित आहे.