यॉर्कशायरमध्ये चेतेश्वर पुजाराला 'स्टीव्ह' म्हटले जायचे; माजी कर्मचाऱ्याचा वर्णद्वेषाबाबत धक्कादायक खुलासा

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 5 डिसेंबर 2020

क्रिकेटर अजीम रफीक याने यॉर्कशायर काऊंटी क्रिकेट संघावर संस्थागत वर्णद्वेषाचे आरोप केले होते. त्याला वेस्टइंडिजचा माजी खेळाडू टीनो बेस्ट आणि पाकिस्तानचा राणा नावेद उल-हसन यांनीही समर्थन देत काही पुरावे दिले आहेत.

लीड्स- क्रिकेटर अजीम रफीक याने यॉर्कशायर काऊंटी क्रिकेट संघावर संस्थागत वर्णद्वेषाचे आरोप केले होते. त्याला वेस्टइंडिजचा माजी खेळाडू टीनो बेस्ट आणि पाकिस्तानचा राणा नावेद उल-हसन यांनीही समर्थन देत काही पुरावे दिले आहेत. तसेच यॉर्कशायरचे कर्मचारी टोनी बोरी व ताज बट यांनीही यासंदर्भात काही पुरावे देत येथे विशिष्ट रंग असलेल्या खेळाडूला 'स्टीव्ह' म्हटले जाते असे म्हटले आहे. परदेशी व्यावसायिक खेळाडूच्या रूपाने संघात सामील झालेला भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारालाही त्याचे नाव उच्चारता येत नसल्याने स्टीव्ह म्हटले जायचे, असा खुलासा बट यांनी केला आहे. यॉर्कशायर क्रिकेट फाउंडेशनमध्ये सामुदायिक विकास अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या बट यांनी नियुक्ती झाल्यानंतर केवळ सहा आठवड्यातच पदाचा राजीनामा दिला आहे.  

'आशियाई समुदायाचा उल्लेख करताना टॅक्सी ड्रायव्हर आणि रेस्तरॉ कर्मचाराऱ्यांसाठी काही विशिष्ट संदर्भ वापरले जातात. त्य़ांच्या आशियाई रंगाच्या प्रत्येक व्यक्तीला तेथे स्टीव्ह म्हटले जात असे. एवढेच नव्हे तर भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारालाही त्याचं नाव उच्चारता येते नसल्याने स्टीव्ह म्हटले जायचे, असे बट यांनी स्पष्ट केले आहे. तसे वृत्त 'ईएसपीएनक्रिकइन्फो' नावाच्या एका माध्यमाने दिले आहे.
   
टोनी बोरी यांनीही सन 1996 पर्यंत प्रशिक्षकाची भूमिका बजावल्यानंतर 2011 पर्यंत यॉर्कशायर क्रिकेट मंडळाच्या सांस्कृतिक विविधता अधिकारी पदावर काम केले आहे. त्यांना कृष्णवर्णीय समुदायाच्या क्रीडा विकासासाठीही विकास प्रबंधक म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यांनी मंडळावर आरोप करताना म्हटले आहे की, 'कित्येक तरूण खेळाडूंनी प्रगती करण्यासाठी संघर्ष केला. मात्र, त्यांना ड्रेसिंग रूममधील वातावरण कायमच अडचणीचे आणि अनिच्छुक वाटले. वर्णद्वेषाच्या अडचणीचा त्यांना प्रत्यक्ष रूपाने सामना करावा लागला. याचा परिणाम त्यांच्या प्रदर्शनावर होऊन त्यांना अडचणीनिर्माण करणारे खेळाडू म्हणून संबोधले जावू लागले.'  

क्लबमधील आपल्या अनुभवांबाबत बोलताना 2018मध्ये यॉर्कशायर सोडलेल्या माजी फिरकीपटू रफीक यांनी आपण जो अनुभव घेतला त्यामुळे आत्महत्या करण्याच्या अगदीजवळ गेलो होतो, असे सांगितले. त्यांना अतिशय दडपण आणि अडचणीचा सामना करावा लागला असल्याचेही आरोप त्यांनी यॉर्कशायर संघावर केले आहेत.  

 

संबंधित बातम्या