देशी क्रिकेटपटूंना खांदा-गुडघा दुखापतीची पिडा

 पीटीआय
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांचा अहवाल

नवी दिल्ली: गतमोसमात देशांतर्गत क्रिकेटमधील बहुतांशी खेळाडूंना खांदा किंवा गुडघ्याच्या दुखापती झाल्याचे दुखापत नियंत्रण अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा अहवाल राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांनी तयार केला आहे. अकादमीतर्फे खेळाडूंसाठी ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्मही तयार केला जाणार आहे.

एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षाचा हा अहवाल ४८ पानांचा आहे. या दरम्यान २१८ पुरुष आणि ४४ महिला असे एकूण २६२ खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीनंतर पुनर्वसन उपचारासाठी आले होते.

अडीचशेवर असलेल्या या दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये १४.७५ टक्के (पुरुष आणि महिला) म्हणजे ३८ खेळाडूंना खांदा दुखापत झाली होती. त्यानंतर १३.११ टक्के खेळाडूंमध्ये (३४) गुडघा दुखापती झाल्या होत्या. खेळाडूंचे करिअर धोक्‍यात आणणारी अस्थिबंध या दुखापतीचे प्रमाण तर ७४ टक्के होते, अशी आकडेवारी या अहवालत देण्यात आली आहे.

खांदा आणि गुडघा दुखापतीनंतर घोटा (११.४८ टक्के), मांडी (१०.४९) आणि मणका (७.५४) या दुखापती क्रिकेटपटूंमध्ये आढळून आल्या आहेत. 

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी काही गोष्टींची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी द्रविड यांनी काही महिन्यांपूर्वी (कोरोनासंकट येण्याअगोदर) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी नवा आराखडा सादर केला होता. 

प्रशिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या या अहवालात प्रशिक्षक मार्गदर्शन कार्यक्रमावरही भाष्य करण्यात आले आहे. प्रशिक्षकांसाठी अभ्यासक्रम असा एक टप्पा असणार आहे, त्यात फिजिओथेरपी आणि क्षमतावृद्धी असे दोन विषय त्यात असणार आहेत. साधारणतः ५७६ प्रशिक्षक सहभागी होणाऱ्या या अभ्यासक्रमात २४ टप्पे असणार आहेत.
 

संबंधित बातम्या