गोव्यात होणार भारतीय फुटबॉलचा `नवा आरंभ`

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

कोलकात्याचा एटीके मोहन बागान आणि केरळा ब्लास्टर्स या संघांतील फुटबॉल लढतीसाठी शुक्रवारी (ता. २०) संध्याकाळी साडेसात वाजता रेफरी सामना सुरू झाल्याची शिट्टी फुंकतील, तो भारतीय फुटबॉलसह, देशातील क्रीडा क्षेत्रातील नवा आरंभ असेल.

पणजी : कोलकात्याचा एटीके मोहन बागान आणि केरळा ब्लास्टर्स या संघांतील फुटबॉल लढतीसाठी शुक्रवारी (ता. २०) संध्याकाळी साडेसात वाजता रेफरी सामना सुरू झाल्याची शिट्टी फुंकतील, तो भारतीय फुटबॉलसह, देशातील क्रीडा क्षेत्रातील नवा आरंभ असेल. कोविड-१९ पार्श्वभूमीवर देशात खेळली जाणारी पहिली मोठी क्रीडा स्पर्धा हा मान अर्थातच इंडियन सुपर लीगला (आयएसएल) स्पर्धेत मिळेल.

गोव्यातील तीन स्टेडियमवर शुक्रवारपासून बंद दरवाज्याआड आणि कोविड-१९ संबंधित आरोग्यविषयक मार्गदर्शक शिष्टाचाराच्या कडक अंमलबजावणीसह जैवसुरक्षा वातावरणात आयएसएल स्पर्धेचा सातवा मोसम रंगणार आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळी येथील जीएमसी स्टेडियम, वास्को येथील टिळक मैदान येथे सामने खेळले जातील. एकूण ११ संघांच्या या स्पर्धेत ११५ सामने होतील. त्यात पाच बदली खेळाडूंचा नियमही भारतीय फुटबॉलमध्ये प्रथमच वापरला जाईल. स्पर्धेच्या साखळी फेरीतील अव्वल चार संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. स्पर्धेत देशातील प्रमुख फुटबॉलपटूंसह परदेशी खेळाडूंचाही सहभाग आहे.

२०१९-२० मोसमातील सहाव्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना गोव्यातच फातोर्डा येथे १४ मार्च २०२० रोजी खेळला होता. कोविड-१९मुळे तो सामनाही रिकाम्या स्टेडियमवर झाला होता. तेव्हा एटीके एफसीने चेन्नईयीन एफसीला हरवून तिसऱ्यांदा आयएसएल करंडक जिंकला होता. त्यानंतर लॉकडाऊनमुळे क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या. आता तब्बल आठ महिन्यांनंतर देशातील प्रमुख क्रीडा स्पर्धा पुनरागमन करत आहे. सातव्या आयएसएलमधील पहिला सामना बांबोळी येथे शुक्रवारी एटीके मोहन बागान आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात खेळला जाईल.

प्रथमच एका शहरातील दोन संघ

एटीके मोहन बागान, केरळा ब्लास्टर्ससह बंगळूर एफसी, चेन्नईयीन एफसी, एफसी गोवा, हैदराबाद एफसी, जमशेदपूर एफसी, मुंबई सिटी एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड, ओडिशा एफसी, एससी ईस्ट बंगाल या अकरा फ्रँजाईजी संघांत मार्चपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत विजेतेपदासाठी चुरस राहील. गतमोसमात आय-लीग स्पर्धा जिंकलेल्या मोहन बागानचे एटीके संघात विलनीकरण झाले आहेत, तर ईस्ट बंगाल स्पर्धेत पदार्पण करत आहे. कोलकात्यातील या दोन जुन्याजाणत्या संघांमुळे आयएसएलच्या इतिहासात प्रथमच एका शहरातील दोन संघ खेळतील. एटीके मोहन बागान व ईस्ट बंगाल यांच्यात २७ नोव्हेंबरला वास्को येथे लढत होईल. या ऐतिहासिक कोलकाता डर्बीकडे भारतीय फुटबॉलविश्वाचे लक्ष राहील.

विजेतेपदासाठी चुरस

आयएसएलमध्ये यंदा विजेतेपदासाठी जोरदार चुरस असेल. एटीकेने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. त्यांना गाठण्यासाठी दोन वेळच्या विजेत्या चेन्नईयीनचा प्रयत्न असेल. बंगळूरने एकवेळ विजेतेपद मिळविले असून या संघाचे स्पॅनिश प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात दुसऱ्यांदा आयएसएल करंडक जिंकून एटीकेच्या अंतोनियो हबास यांच्याशी बरोबरी साधण्याच्या प्रयत्नशील असतील. गतमोसमात साखळी फेरीत अव्वल राहत एफसी गोवाने लीग विनर्स शिल्ड मिळवत एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्रता मिळविली होती.

आरोग्य सुरक्षेला प्राधान्य

आयएसएल स्पर्धेत आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. स्पर्धा मार्गदर्शक शिष्टाचारानुसार स्पर्धेत सहभाग असलेल्या प्रत्येकास दैनंदिनी आरोग्यविषयक माहिती खास अॅपद्वारे द्यावी लागेल. गोव्यात दाखल झाल्यापासून सर्व संघ जैवसुरक्षा वातावरणात असून स्पर्धेच्या कालावधीतही बायो-बबल कायम राहील. संपूर्ण स्पर्धा मोसमाच्या कालावधीत प्रत्येक क्लबचा आरोग्य अधिकारी संघातील खेळाडू-अधिकाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी पाहेल.

आयएसएल विजेते संघ

- एटीके एफसी (३ वेळा) : २०१४, २०१६, २०१९-२०

- चेन्नईयीन एफसी (२ वेळा) : २०१५, २०१७-१८

- बंगळूर एफसी (१ वेळ) : २०१८-१९

- लीग विनर्स शिल्ड : एफसी गोवा (१ वेळ) २०१९-२०

 
 

संबंधित बातम्या