एफसी गोवासाठी भारतीय खेळाडू महत्त्वाचे : आंगुलो

किशोर पेटकर
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

‘‘भारतीय फुटबॉलपटू गुणवान आहेत. एफसी गोवाच्या यशासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे असेल. त्याची कामगिरी निर्णायक ठरेल,’’ असे हा ३६ वर्षीय आघाडीपटू म्हणाला.

पणजी: आगामी फुटबॉल मोसमात एफसी गोवा संघासाठी भारतीय खेळाडूंचे योगदान महत्त्वपूर्ण असेल, असे मत संघातील नवा स्पॅनिश स्ट्रायकर इगोर आंगुलो याने व्यक्त केले. स्पेनमधून त्याने बुधवारी ऑनलाईन माध्यमाद्वारे संवाद साधला.

‘‘भारतीय फुटबॉलपटू गुणवान आहेत. एफसी गोवाच्या यशासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे असेल. त्याची कामगिरी निर्णायक ठरेल,’’ असे हा ३६ वर्षीय आघाडीपटू म्हणाला. एफसी गोवा संघातून खेळलेल्या स्पॅनिश फुटबॉलपटूंशी चर्चा केल्यानंतर, तसेत गोव्यातील सुविधा, फुटबॉलविषयक बाबींची माहिती मिळविल्यानंतर आपण एफसी गोवा संघाशी करार करण्याचे ठरविले, असे त्याने स्पष्ट केले. 

मागील चार मोसम पोलंडमधील व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत यशस्वी छाप पाडलेला इगोर आंगुलो यापूर्वी स्पेन, फ्रान्स, सायप्रस, ग्रीसमध्येही व्यावसायिक फुटबॉल खेळला आहे. स्पेनमधील ॲथलेटिक बिल्बाओ संघातर्फे व्यावसायिक कारकिर्दीस सुरवात केली. २०१६ पासून पोलंडमधील गॉर्निक झाब्रझ या संघाचा आघाडीफळीतील प्रमुख खेळाडू ठरला. तेथील पहिल्या मोसमात त्याच्या शानदार कामगिरीमुळे झाब्रझ संघाने अव्वल श्रेणीसाठी (एक्स्ट्राक्लासा) पात्रता मिळविली होती. त्याने या संघातर्फे सर्व स्पर्धांत मिळून १५४ सामन्यांत ८८ गोल व २१ असिस्ट अशी कामगिरी केली आहे. एक्स्ट्राक्लासा स्पर्धेत त्याने २०१८-१९ मोसमात सर्वाधिक २४ गोल नोंदवून गोल्डन बूटचा मान पटकावला होता.

युरोपबाहेर इगोर आंगुलो प्रथमच व्यावसायिक फुटबॉल खेळत आहे. ‘‘युरोपबाहेर प्रथमच खेळत असलो, तरी नव्या आव्हानासाठी मी प्रेरित आहे,’’ असे त्याने आत्मविश्वासाने सांगितले.

दबाव झेलणे आवडते
एफसी गोवा संघातील पुढील वाटचालीत इगोर आंगुलो या संघाचा यशस्वी स्पॅनिश आघाडीपटू फेरान कोरोमिनास याची जागा घेणार आहे. एफसी गोवा संघाच्या चाहत्यांत कोरो या टोपणनावाने परिचित असलेल्या यशस्वी खेळाडूची भूमिका वठविताना आपल्यावर दबाव निश्चितच असेल, पण खेळताना दबाव झेलणे आपल्यास आवडते आणि त्याची सवय आहे. सर्वोत्कृष्ट खेळ करणे आपणास नेहमीच आवडते, असे स्पेनमधील बिल्बाओ येथील रहिवासी असलेल्या या सेंटर-फॉरवर्ड खेळाडूने सांगितले. एफसी गोवाकडून सलग तीन आयएसएल मोसम खेळताना कोरो याने ५७ सामन्यांतून ४८ गोल नोंदविले, तर १६ असिस्ट आहेत. दोन सुपर कप स्पर्धेत ७ गोल केले आहेत. एफसी गोवासाठी कोरोमिनासची कामगिरी दिग्गज असल्याचेही आंगुलो याने नमूद केले.

चँपियन्स लीगचे लक्ष्य
एएफसी चँपियन्स लीग स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेचा भाग बनण्याची संधी मिळतेय या उद्देशाने एफसी गोवाच्या करारावर सही करण्याचे प्रमुख कारण असल्याची कबुली आंगुलो याने दिली. २०१९-२० मोसमात आयएसएल लीग विनर्स शिल्ड जिंकून एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय फुटबॉल क्लब हा मान एफसी गोवाने मिळविला आहे. रिकाम्या स्टेडियमवर खेळणे कठीण असेल, आम्ही चाहत्यांच्या प्रोत्साहनास मुकणार आहोत, पण घरच्या मैदानावर खेळणे लाभदायक असेल, असे तो म्हणाला.   

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या