आयपीएल कार्यक्रमात सीमावाद

पीटीआय
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

अमिरातीमधील तीन शहरांतील भिन्न कोरोना नियमावलीमुळे बीसीसीआय त्रस्त

मुंबई/ नवी दिल्ली: कोरोना आक्रमणातही आयपीएल घेण्याचे भारतीय क्रिकेट मंडळाने ठरवले, पण त्याचे प्रश्‍न संपण्यास तयार नाहीत. लीग तीन आठवड्यांवर येऊनही स्पर्धा वेळापत्रक तयार होण्यास तयार नाही. दुबई, शारजासह अबूधाबीतही लढती आयोजित करण्याचा निर्णय घेताना भारतीय मंडळाने ‘सीमा प्रश्‍न’ लक्षात न घेतल्याचा फटका लीगला बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

आयपीएलसाठी आठ संघ आखातात दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मुक्काम अबूधाबीत आहे; तर अन्य सहा संघांचा दुबईत. आता अबूधाबी, शारजा तसेच दुबईतील विलगीकरणाचे नियम भिन्न असल्याचे चटके आयपीएल संयोजन समितीस बसण्यास सुरुवात झाली आहे.

लीगच्या सुरळीत संयोजनासाठी सुविधांची रेकी करण्यासाठी गेलेले पथक विलगीकरणात आहे. आयपीएलसाठी कोरोनाच्या नियमात सूट देण्यासाठी भारतीय मंडळाचे पदाधिकारी अमिराती आरोग्य मंत्रालयाचे मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण अबूधाबीचा प्रश्‍न चांगलाच ठसठसू लागला आहे. लीगच्या नियमानुसार प्रत्येक खेळाडूची पाच दिवसांत एकदा चाचणी होईल. अबूधाबीतील अटी खूपच कठोर आहेत.

अबूधाबीची डोकेदुखी
अबूधाबीत प्रवेश करताना चाचणी बंधनकारक आहे. चाचणीचा निकाल तातडीने देण्यासाठी ५० दिराम (सुमारे एक हजार ११ रुपये) मोजावे लागतात. या चाचणीनंतर ४८ तासच अबूधाबीत राहता येते. भारतीय मंडळाचा यामुळे अबूधाबीत सलग लढती घेण्याचा विचार होता; मात्र त्यामुळे दुबईत मुक्काम करणाऱ्या संघांची डोकेदुखी वाढेल. त्यासाठी त्यांच्या सलग दोन लढती घेण्याचा विचार आहे. अमिरातीतच नव्हे, तर कुठेही सलग दोन दिवस खेळणे त्रासदायकच आहे. फ्रॅंचाईजचा त्यास विरोध आहे; मात्र केवळ खेळाडूच नव्हे, तर समालोचक, दूरचित्रवाणी पथक, सामनाधिकारी यांनाही सलग दोन दिवस काम करावे लागेल. शारजा आणि दुबई सहकार्यास तयार आहेत. त्यामुळे अबूधाबीला वगळण्याचा विचार समोर येत आहे; मात्र दोन संघांचा मुक्काम अबूधाबीत आहे. त्यामुळे दुबईत मुक्काम केलेल्या संघातील खेळाडूंची आदल्या रात्री हॉटेलमध्ये चाचणी होईल. 

डबल हेडरच्या सामन्याची वेळही कष्टाची
आयपीएल संयोजकांनी कार्यक्रम जाहीर करताना १० दिवस दोन लढती होतील असे सांगितले आहे, पण सध्याचे दुबईतील वातावरण दुपारच्या लढतीसाठी पोषक नाही. पहाटे ३ वाजता दुबईत उतरलो, त्या वेळी गरम वाफा अंगावर आल्या असे ट्विट डेल स्टेनने केले आहे. या परिस्थितीत भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० होणारी लढत ५ पर्यंत लांबणीवर टाकण्याची सूचना येत आहे. या परिस्थितीत दुसरी लढत संध्याकाळी ७.३० वाजता सुरू कशी करणार हाही प्रश्‍न आहे.

 

संबंधित बातम्या