मॉरिसियोच्या धडाक्यासह ओडिशाचा पहिला विजयी जल्लोष ; केरळा ब्लास्टर्सला 4-2 फरकाने केलं पराभूत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

ब्राझीलियन स्ट्रायकर दिएगो मॉरिसियोच्या धडाकेबाज दोन गोलच्या बळावर ओडिशा एफसीने अखेर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात अखेर पहिल्या विजयाचा जल्लोष केला.

पणजी :  ब्राझीलियन स्ट्रायकर दिएगो मॉरिसियोच्या धडाकेबाज दोन गोलच्या बळावर ओडिशा एफसीने अखेर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात अखेर पहिल्या विजयाचा जल्लोष केला. त्यांनी पिछाडीवरून मुसंडी मारताना केरळा ब्लास्टर्सला 4-2 फरकाने हरविले. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर काल अवेळी  पाऊस आणि जोरदार गडगडाटासह सामना रंगला. ओडिशा एफसीला पूर्ण तीन गुण मिळवून देताना ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियो याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 50 व 60व्या मिनिटास चेंडूला नेटची दिशा दाखविली. त्यापूर्वी ओडिशासाठी मॉरिसियोच्याच फटक्यावर केरळा ब्लास्टर्सच्या जीकसन सिंगद्वारे 22व्या मिनिटास स्वयंगोल आणि नंतर कर्णधार इंग्लिश खेळाडू स्टीवन टेलर याने 42व्या मिनिटास गोल केला.

केरळा ब्लास्टर्सला सामन्याच्या सातव्या मिनिटास ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने आघाडी मिळवून दिली होती. 79व्या मिनिटास इंग्लिश खेळाडू गॅरी हूपर याने केरळा ब्लास्टर्सची पिछाडी आणखी एका गोलने कमी केली. त्यानंतर त्यांनी गोलसाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु कोचीच्या संघाला गोलरक्षक अर्शदीप सिंग व गोलपोस्टमुळे यश लाभले नाही. कलिंगा वॉरियर्स संघाचे आता पहिल्या विजयानंतर नऊ लढतीनंतर पाच गुण झाले आहेत, पण त्यांचे तळाचे अकरावे स्थान कायम आहेत. केरळा ब्लास्टर्सला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे नऊ लढतीनंतर सहा गुण व दहावा क्रमांक कायम राहिला.

सामन्याच्या पूर्वार्धात एका गोलच्या पिछाडीनंतर ओडिशा एफसीने आघाडी प्राप्त केली. स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला सातव्याच मिनिटास धक्का बसला. केरळा ब्लास्टर्सच्या राहुल केपी याचा हेडर ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याने रोखला होता, पण तो चेंडूवर ताबा राखू शकला नाही. त्याचा लाभ उठवत जॉर्डन मरे याने चेंडूस नेटची दिशा दाखविली. भुवनेश्वरच्या संघाने नंतर जोरदार खेळ करत बरोबरीसाठी प्रयत्न केले व त्यात त्यांना यश लाभले. जेरी माविमिंगथांगा याच्या पासवर ब्राझीलियन दिएगो मॉरिसियोचा फटका केरळाच्या जीकसन सिंग याला आपटून स्वयंगोल झाला. आपल्याच खेळाडूच्या चुकीमुळे गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला चेंडूचा अंदाज आला नाही. विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असताना कर्णधार स्टीवन टेलर याने केरळा ब्लास्टरचा बचाव विस्कळित झाल्याची संधी साधली व ओडिशाला आघाडी मिळवून दिली. जेरीने फ्रीकिक फटका नियंत्रित करत आपल्या कर्णधारास गोल नोंदविण्याची संधी प्राप्त करून दिली.

विश्रांतीनंतरच्या पाचव्याच मिनिटास दिएगो मॉरिसियोने ओडिशा एफसीची आघाडी आणखीनच भक्कम केली. पुन्हा एका जेरीच्या असिस्टवर मॉरिसियोने गोलरक्षक आल्बिनोस गुंगारा दिला. त्यानंतर तासाभराच्या खेळात मॉरिसियोने नंदकुमार शेखरच्या असिस्टवर आणखी एक गोल करून ओडिशाला विजयाच्या दिशेने नेले.

 

दृष्टिक्षेपात...

- केरळा ब्लास्टर्सच्या जॉर्डन मरे याचे आता 3 गोल

- ओडिशा एफसीच्या स्टीवन टेलरचे 2 गोल

- ओडिशा एफसीच्या दिएगो मॉरिसियो याचे आता 5 गोल

- केरळाच्या गॅरी हूपरचे यंदाच्या स्पर्धेत 2 गोल

- 2 बरोबरी, 6 पराभवानंतर ओडिशाचा विजय

- केरळा ब्लास्टर्सवर मोसमात प्रतिस्पर्ध्यांद्वारे सर्वाधिक 17 गोल

- ओडिशाने स्वीकारलेले गोल 16

 

संबंधित बातम्या