इंडियन सुपर लीग: आल्बर्टो नोगेराची तुलना ह्युगो बुमूसशी शक्य

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 6 सप्टेंबर 2020

गतमोसमातील गोल्डन बॉल मानकऱ्याची जागा घेण्याची जबाबदारी

पणजी: एफसी गोवा संघाने दोन वर्षांसाठी करारबद्ध केलेला स्पॅनिश मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा याची तुलना गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत गोल्डन बॉलचा मानकरी ठरलेल्या फ्रेंच आक्रमक मध्यरक्षक ह्युगो बुमूस याच्याशी होण्याची शक्यता आहे.

आगामी आयएसएल स्पर्धेत मुंबई सिटीकडून खेळण्यासाठी २४ वर्षीय बुमूसला मुक्त करण्यात आल्याचे अजून एफसी गोवा संघाने जाहीर केलेले नाही. मागे जुलैमध्ये आपण एफसी गोवाशी फारकत घेत असल्याचे बुमूसने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले होते, तर एफसी गोवाने तो अजूनही आपलाच करारबद्ध खेळाडू असल्याचे स्पष्ट केले होते. आता एफसी गोवा संघाने नोगेरासह पाच स्पॅनिश फुटबॉलपटू २०२०-२१ मोसमासाठी करारबद्ध केले आहेत. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळणार असल्यामुळे एफसी गोवास नियमानुसार आशियाई खेळाडू करारबद्ध करावा लागेल. त्यामुळे गतमोसमाप्रमाणेच एफसी गोवा संघात सहा परदेशी फुटबॉलपटू होतील, त्यामुळे बुमूस इंडियन सुपर लीग शिल्ड विनर्स संघाकडून पुढील मोसम खेळणार नसल्याचे जाणवते.

बुमूसने गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत गोव्यातील संघाचे प्रतिनिधित्व करताना १५ सामन्यांत ११ गोल, १० असिस्ट अशी अप्रतिम कामगिरी प्रदर्शित केली होती, त्यामुळे तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. २०१८ पासून एफसी गोवा संघातर्फे सर्व स्पर्धांत मिळून या चपळ मध्यरक्षकाने ४७ सामन्यांत २० गोल व १७ असिस्टचा समावेश आहे. याशिवाय २०१९ मधील सुपर कप विजेतेपदात आणि २०१९-२० मोसमातील लीग विनर्स शिल्ड कामगिरीत मोलाचा वाटा उचलला होता. जानेवारी २०१८ मध्ये एफसी गोवा संघात मान्युएल अराना याची जागा घेतलेल्या बुमूसने गतमोसमात एफसी गोवाच्या मध्यफळीत हुकमी खेळ केला होता, त्यामुळे अनुभवी एदू बेदिया यालाही मर्यादित संधी मिळाली होती.

आगामी मोसमात मध्यफळीत एफसी गोवाची मदार एदू बेदिया व आल्बर्टो नोगेरा यांच्यावर असेल हे स्पष्टच आहे. नोगेरा हा एफसी गोवाच्या शैलीत चपखलपणे खेळू शकणारा आणि प्रतिस्पर्धी बचावफळी अनलॉक करू शकणारा खेळाडू आहे. तो तांत्रिकदृष्ट्या अतिशय सरस खेळाडू आहे. एफसी गोवाचा नेहमीच चेंडूवर ताबा राखण्यावर आणि सामन्यात पुढाकार घेण्यावर भर असतो, ते साध्य करण्यास आल्बर्टो आम्हाला मदत करेल याचा विश्वास वाटतो, असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी नव्या खेळाडूस करारबद्ध करताना सांगितले. याचाच अर्थ नव्या मोसमात प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या व्यूहरचनेत नोगेरा याला महत्त्वाचे स्थान असेल. हा ३० वर्षीय मध्यरक्षक स्पेनमधील ॲटलेटिको माद्रिदसह व्यावसायिक संघातून खेळला आहे. त्याचा दशकभरातील अनुभव माजी आयएसएल उपविजेत्यांसाठी निर्णायक ठरू शकतो.

संबंधित बातम्या