इंडियन सुपर लीग: ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटूंना प्राधान्य

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या २०२०-२१ मोसमात खेळणाऱ्या संघांसाठी आशियाई विभागातील एक खेळाडू करारबद्ध करणे बंधनकारक आहे.

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या २०२०-२१ मोसमात खेळणाऱ्या संघांसाठी आशियाई विभागातील एक खेळाडू करारबद्ध करणे बंधनकारक आहे. पूर्वी ओसेनिया गटात खेळणारा ऑस्ट्रेलिया देश आता आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या देशातील फुटबॉलपटूंना आयएसएल स्पर्धेत प्राधान्य मिळत आहे.

येत्या नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणाऱ्या आयएसएल स्पर्धेच्या सातव्या मोसमासाठी खेळाडू करार प्रक्रिया सध्या सुरू आहे. स्पर्धेतील दहापैकी चार संघांना आतापर्यंत आशियाई फुटबॉलपटूचा कोटा पूर्ण केलेला आहे. या साऱ्या संघांनी ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटूंना करारबद्ध करून त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्याचे ठरविले आहे. हे सारे खेळाडू ऑस्ट्रेलियातील ए-लीग स्पर्धेत दीर्घकाळ खेळलेले आहेत.

पुन्हा डेव्हिड विल्यम्स
एटीके-मोहन बागानने ३३ वर्षीय ऑस्ट्रेलियन आघाडीपटू डेव्हिड विल्यम्स याला आणखी एका आयएसएल मोसमासाठी करारबद्ध केले आहे. गतमोसमात विजेतेपद मिळविलेल्या एटीके संघासाठी डेव्हिड व फिजी देशाचा रॉय कृष्णा यांची आक्रमणातील कामगिरी निर्णायक ठरली होती. पुन्हा एकदा ते एकत्रित खेळतील गतमोसमातील १८ आयएसएल सामन्यांत डेव्हिडने ७ गोलसह ५ असिस्टची नोंद केली होती. स्कॉटलंडच्या २१ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केलेला, पण ऑस्ट्रेलियात जन्मलेला व तेथील ए-लीग स्पर्धेत खेळलेला २८ वर्षीय मध्यरक्षक ब्रॅड इनमॅन यालाही एटीके-मोहन बागानने आगामी मोसमासाठी करारबद्ध केले आहे.

पर्थ ग्लोरी संघातील दोघे जण
ओडिशा एफसीने बचावफळीत ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू निवडला आहे. ६ फूट ३ इंच उंचीचा २६ वर्षीय सेंटर बॅक खेळाडू जेकब ट्रॅट आगामी मोसमात भुवनेश्वरमधील संघाकडून खेळेल. गतमोसमातील ए-लीग स्पर्धेत त्याने पर्थ ग्लोरी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पर्थ ग्लोरी या संघातून २०१६ ते २०२० अशी चार वर्षे खेळलेला ३० वर्षीय अनुभवी स्ट्रायकर जोएल चियानेज याची हैदराबाद एफसीने निवड केली आहे. तो आगामी आयएसएल स्पर्धेत हैदराबाद संघाचे नेतृत्व करण्याचे संकेत आहेत. ए-लीग स्पर्धेतील सात मोसमात जोएलने २५ गोल केले आहेत.

एरिक पार्तालूचा चौथा मोसम
माजी आयएसएल विजेत्या बंगळूर एफसीने ऑस्ट्रेलियन मध्यरक्षक एरिक पार्तालू याला सलग चौथ्या मोसमासाठी संघात कायम राखून त्याच्या अनुभवावर विश्वास दाखविला आहे. सिडनी येथील हा ३४ वर्षीय चपळ फुटबॉलपटू २०१७-१८ पासून बंगळूरचे प्रतिनिधित्व करत आहे. आयएसएल स्पर्धेत या संघाकडून तो ४९ सामने खेळला असून ७ गोल आणि ८ असिस्ट अशी त्याची कामगिरी आहे.

संबंधित बातम्या