इंडियन सुपर लीग: आत्मविश्वासामुळे आल्बर्टो नोगेरास अपेक्षांची जाणीव

क्रीडा प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

एफसी गोवाच्या नव्या स्पॅनिश मध्यरक्षकास मैदानावर खेळण्याची प्रतीक्षा

पणजी: एफसी गोवा संघाचा नवा स्पॅनिश मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा नव्या मोसमापूर्वी आत्मविश्वासाने भारलेला असून त्याला चाहत्यांकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव आहे. याबाबत त्याने एफसी गोवाच्या संकेतस्थळावर मनोगत व्यक्त केले.

आगामी (२०२०-२१) मोसमात तीस वर्षीय नोगेरा एफसी गोवाच्या जर्सीत प्रथमच खेळताना दिसेल. त्याच्याशी संघाने दोन वर्षांचा करार केला आहे. आपणास प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याची प्रतीक्षा आहे. हे खूपच चांगले आव्हान आहे, असे त्याने एफसी गोवातर्फे खेळण्याविषयी नमूद केले. 

‘‘एफसी गोवाने गतमोसमात आयएसएल लीग विजेतेपद मिळविले. यावर्षीही लक्ष्य त्याचप्रमाणे असेल. त्यामुळे लोकांना आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत याची जाणीव आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही एक पाऊल पुढे जात, सर्व काही जिंकू. येथे खेळताना मोठे आव्हान नसते, तर मी आलोच नसतो,’’ असे नोगेरा आगामी मोसमासविषयी म्हणाला.

‘‘खेळाडू या नात्याने मी माझी क्षमता जाणून आहे, त्यामुळे कोणताच दबाव जाणवत नाही. एक मात्र नक्की आहे, आम्हाला खूप काम करावे लागेल, तसेच मेहनत घ्यावी लागेल. तथापि, आमच्या खेळाडूंच्या दर्जाविषयी आणि महत्त्वाचे म्हणजे मानसिकतेची मला पूर्ण खात्री आहे,’’ असे तो एफसी गोवा संघाविषयी म्हणाला.

स्पेनचा किनारा सोडून गोव्यात खेळण्यासाठी येणे नोगेरा याच्यासाठी सोपे नव्हते, पण आशियात खेळण्याचे त्याला आकर्षण होते. त्यामुळे आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेत्या संघाशी करार करणे मोठा बहुमान असल्याचे तो मानतो. ‘‘एफसी गोवातील माजी खेळाडू कार्लोस पेना याच्याशी संघासंबंधी केलेली चर्चा आणि या संघाचा व्यावसायिक दृष्टिकोन आदींचा सविस्तर विचार केल्यानंतर मी भारतात आणि गोव्यात खेळण्याचा निर्णय पक्का केला,’’ असे माद्रिद येथील या खेळाडूने स्पष्ट केले. गोव्यात खेळण्याचा अनुभव विस्मयजनक ठरले, असे त्याला वाटते. एफसी गोवा संघ आणि वातावरणात रूळण्यास जास्त वेळ लागणार नाही, असेही त्याने नमूद केले.

कोरोना विषाणू रोखू शकत नाही
कोरोना विषाणू महामारीच्या अनुषंगाने आल्बर्टो नोगेरा याने सकारात्मक दृष्टिकोन बाळगला आहे. ‘‘कोविड आमचे जीवन रोखू शकत नाही. आम्हाला सावधनता बाळगावी लागेल आणि योग्य निर्णय घ्यावा लागेल. आम्ही जगण्यास घाबरू शकत नाही,’’ असे तो खंबीरपणे म्हणाला. आगामी मोसमात सर्वोत्तम कामगिरी बजावण्याचे आश्वासन त्याने एफसी गोवाच्या चाहत्यांना दिले आहे.

संबंधित बातम्या