इंडियन सुपर लीग: जमशेदपूर संघात इंग्लंडचा बचावपटू पीटर हार्टली

क्रीडा प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

जमशेदपूर एफसी संघाने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी इंग्लंडमधील ३२ वर्षीय बचावपटू पीटर हार्टली याच्याशी करार केला आहे. 

पणजी : जमशेदपूर एफसी संघाने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी इंग्लंडमधील ३२ वर्षीय बचावपटू पीटर हार्टली याच्याशी करार केला आहे. 

पीटर हार्टली २०२०-२१ मोसमात ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर संघाचे प्रतिनिधित्व करेल. हार्टली गतमोसमात स्कॉटिश प्रीमियर स्पर्धेतील मदरवेल एफसी संघाकडून खेळला होता. त्याने या संघाचे नेतृत्वही केले होते. मदरवेलला सेल्टिक व रँजर्स संघानंतर लीगमध्ये तिसरा क्रमांक मिळाला. त्यामुळे हा संघ २०२०-२१ मोसमातील यूईएफए युरोपा लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

हार्टली याने व्यावसायिक फुटबॉलपटू या नात्याने २००७ मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो ४१८ सामने खेळला असून १२२ सामन्यांत एकही गोल स्वीकारला नाही, शिवाय त्याने ३७ गोलही नोंदविले आहेत. 

हार्टली याची संडरलंड एएफसीच्या अकादमीत जडणघडण झाली. सेंटर बॅक जागी डाव्या पायाने खेळण्यात पटाईत असलेल्या या बचावपटूने २००७ साली इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये रॉय कीन यांच्या मार्गदर्शनाखालील संडरलंड संघातून पदार्पण केले. त्यानंतर तो लोनवर चेस्टरफिल्ड संघाकडून खेळला, नंतर हार्टलपूल युनायटेडचे २००९ पासून चार मोसम प्रतिनिधित्व केले, त्यापैकी दोन मोसम तो कर्णधार होता. त्यानंतर स्टीव्हनेज, प्लायमाऊथ, ब्रिस्टल रोव्हर्स, ब्लॅकपूल या संघांकडून खेळल्यानंतर तो मदरवेल संघात दाखल झाला. जमशेदपूर संघात पीटर हार्टली २९ क्रमांकाची जर्सी वापरेल. goa

संबंधित बातम्या