इंडियन सुपर लीग: चेन्नईयीन संघात अनुभवी बचावपटू

क्रीडा प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

मिझोराममधील चुआन्तेआ व मणिपूरच्या रीगनशी करार

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा दोन वेळा जिंकलेल्या चेन्नईयीन एफसीने दोघा अनुभवी बचावपटूंना संघात सामावून घेतले आहे. लेफ्टबॅक लालचुआनमाविया फनाई व राईटबॅक रीगन सिंग चेन्नईच्या संघाचे प्रतिनिधित्व करतील.

चुआन्तेआ या टोपणनावाने ओळखला जाणारा फनाई ३१ वर्षांचा असून तो मिझोराममधील आहे. मणिपूरचा रीगन २९ वर्षीय आहे. गोव्यात होणाऱ्या आयएसएलच्या सातव्या मोसमात सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आपण आतूर असल्याचे चुआन्तेआ याने चेन्नईयीनशी करार केल्यानंतर सांगितले. रीगनने या संघाकडून खेळताना आयएसएल करंडक जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे.

चुआन्तेआ याने पंजाबच्या जेसीटी संघातर्फे व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले. शिलाँग लाजाँगकडून खेळल्यानंतर तो बंगळूर एफसी संघात दाखल झाला. या संघातर्फे तो २०१४-१५ मोसमात फेडरेशन करंडकाचा, तर २०१५-१६ मोसमात आय-लीग विजेतेपदाचा मानकरी ठरला. नंतर आयएसएल स्पर्धेत तो २०१६ मध्ये मुंबई सिटी एफसीकडून, तर २०१७-१८ मोसमात एफसी पुणे सिटीकडून खेळला २०१९-२० मधील आयएसएल स्पर्धेत तो ओडिशा एफसी संघाकडून मैदानात उतरला. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले असून २०१५ साली सॅफ करंडक विजेत्या भारताच्या संघात त्याचा समावेश होता. 

रॉयल वाहिंगडोह संघाकडून २०१२ साली कारकिर्दीस सुरवात केल्यानंतर रीगन सिंग या संघाकडून तीन वर्षे खेळला. मागील पाच मोसम गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडकडून तो आयएसएल स्पर्धेत ६९ सामने खेळला आहे. आय-लीग स्पर्धेत त्याने गोव्याच्या साळगावकर एफसी व मुंबई एफसी या संघाकडून भाग घेतला आहे.

ओडिशा संघात स्पॅनिश आघाडीपटू
आगामी आयएसएल स्पर्धेसाठी ओडिशा एफसी संघाने स्पॅनिश आघाडीपटू ३२ वर्षी मान्युएल ओन्वू याला करारबद्ध केले आहे. आयएसएलच्या २०१९-२० मोसमात त्याने बंगळूर एफसी संघाशी करार केला होता, पण लोनवर ओडिशाकडून खेळला होता. त्याने उपयुक्तता सिद्ध करताना सात गोल नोंदविला, त्यात केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या हॅटट्रिकचाही समावेश होता. स्पेनमधील तुदेला येथे जन्मलेल्या ओन्वू याने मार्च २०१२ मध्ये सीए ओसासुना संघाकडून ला-लिगा स्पर्धेत पदार्पण केले होते.  

संबंधित बातम्या