Indian Super League: गोलरक्षक नवाझला एफसी गोवाचा निरोप

NAWAJ 1.jpg
NAWAJ 1.jpg

पणजी : सलग तीन मोसम एफसी गोवासाठी (FC Goa) गोलरक्षण केलेला युवा फुटबॉलपटू महंमद नवाझ (Mohammad Nawaz) याला संघाने बुधवारी अधिकृतपणे निरोप दिला. यावेळी क्लबने सोशल मीडियाद्वारे गोलरक्षकाचे योगदानाबद्दल आभारही मानले. मूळ मणिपूरचा (Manipur) नवाझ 21 वर्षांचा आहे. त्याने एफसी गोवाचे  2018-19 पासून इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. त्यापूर्वी तो एफसी गोवाच्या डेव्हलपमेंटल संघातून खेळला होता. गोव्यात 2016 साली झालेल्या 17 वर्षांखालील ब्रिक्स स्पर्धेत तो भारतीय संघातून खेळला होता, पण 2017 सालच्या भारतातील 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याची निवड होऊ शकली नव्हती. (Indian Super League FC Goa bids farewell to goalkeeper Nawaz)

गतमोसमात नवाझ आयएसएल स्पर्धेच्या (ISL competitions) पहिल्या टप्प्यात एफसी गोवाचा मुख्य गोलरक्षक होता, पण नंतर त्याने प्रशिक्षक हुआन फेरांडो आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास गमावला. त्यामुळे नंतर या संघाने मणिपूरच्याच धीरज सिंग (Dheeraj Singh) याला करारबद्ध केले व त्याने नवाझची जागा घेतली. नवाझचे भविष्य एफसी गोवा संघात नसल्याचे तेव्हा फेरांडो यांनी सांगितले होते. त्याचा करार 31 मे रोजी संपला.

एफसी गोवाने 2019 साली सुपर कप जिंकला, तर 2019-20 मोसमात आयएसएल लीग विनर्स शिल्ड प्राप्त केली. या दोन्ही यशात नवाझ शिल्पकार ठरला. 2019-20 मोसमातील आयएसएल स्पर्धेत त्याने सलग पाच सामने एकही गोल स्वीकारला नव्हता.

प्राप्त माहितीनुसार, महंमद नवाझ आगामी आयएसएल स्पर्धेत सर्जिओ लोबेरा (Sergio Lobera) यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटी एफसीतर्फे खेळण्याचे संकेत आहेत. अनुभवी गोलरक्षक अमरिंदर सिंग याने मुंबई सिटीस सोडचिठ्ठी देऊन एटीके मोहन बागानशी करार केला आहे.

नवाझची एफसी गोवातर्फे आयएसएल कारकीर्द

- एकूण तीन मोसम ः 2018-19, 2019-20, 2020-21

- एकूण सामने ः 43, एकूण मिनिटे ः 3870

- गोल स्वीकारले ः 57, गोल अडविले ः 96

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com