इंडियन सुपर लीग: बचावपटू महमद अलीच्या करारात दोन वर्षांसाठी वाढ

क्रीडा प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

एफसी गोवाचा खेळाडू नव्या मोसमासाठी सज्ज

पणजी: मागील सलग तीन मोसम खेळलेला बचावपटू महमद अली याला एफसी गोवा संघाने आणखी दोन वर्षांसाठी मुदतवाढ देत करार केला आहे.

अली २८ वर्षांचा असून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाचे २०१७-१८ पासून प्रतिनिधित्व करत आहे. करार वाढल्यामुळे तो आता आगामी मोसमासाठी सज्ज झाला आहे. एफसी गोवा संघाशी गोव्याचा हा बचावपटू २०२२ पर्यंत करारबद्ध असेल. करंझाळे येथील अली याने आतापर्यंत २४ आयएसएल सामन्यात एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केले आहे. या संघातून खेळताना मागील तीन मोसमातील प्रवास आश्चर्यकारक ठरला. एफसी गोवा आपल्यासाठी केवळ क्लब नसून एक कुटुंब आहे, अशी प्रतिक्रिया अली याने वाढीव करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. 

आम्ही सज्ज होत असून आगामी मोसम खूपच आव्हानात्मक असेल. केवळ आयएसएल किताबासाठी नव्हे, तर भारताचे प्रतिनिधित्व करताना एएफसी चँपियन्स लीगसाठीही आम्ही लढणार आहोत, असे अली याने आगामी वाटचालीविषयी सांगितले. 

गतमोसमात अली एफसी गोवा संघातून आयएसएल स्पर्धेत एकच सामना खेळला, त्या पार्श्वभूमीवर, आपल्याला अजूनही भरपूर सुधारणा करणे आवश्यक आहे. क्लबने आपल्यावर विश्वास दाखविला आहे आणि त्याची परतफेड करायचीय, असे अलीने नमूद केले. संघात नियमित जागा मिळविणे हे वैयक्तिक लक्ष्य असल्याचे या बचावपटूने स्पष्ट केले.

अलीचा करार वाढविण्याविषयी एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांगितले, की गोमंतकीय फुटबॉलपटूंना चमकण्यासाठी व्यासपीठ देण्यावर आमचा भर असतो. अली आमच्यासमवेत गेली काही वर्षे आहे. त्याला आमचे तत्वज्ञान पुरेपूर अवगत आहे, तसेच संघाच्या ड्रेंसिग रूम वातावरणाचीही माहिती आहे. त्याच्यामुळे प्रशिक्षक ह्वआन यांना बचावफळीत आणखी पर्याय उपलब्ध होतील.

तिसरा खेळाडू...
आगामी मोसमासाठी करारात मुदतवाढ मिळालेला महमद अली हा एफसी गोवाचा तिसरा फुटबॉलपटू आहे. यापूर्वी स्पॅनिश एदू बेदिया आणि गोव्याचा अनुभवी लेनी रॉड्रिग्ज यांच्याही करारात वाढ करण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या