इंडियन सुपर लीग : एफसी गोवा संघात ताडमाड उंचीचा बचावपटू

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

६ फूट ५ इंचाच्या ऑस्ट्रेलियन जेम्स डोनाची याच्याशी लोन करार

पणजी: आगामी मोसमात एफसी गोवा संघाच्या बचावफळीत ६ फूट ५ इंच उंचीचा फुटबॉलपटू खेळताना दिसेल. इंडियन सुपर लीग (आयएसएल) विनर्स शिल्ड विजेत्या संघाने ऑस्ट्रेलियन जेम्स डोनाची याला एका वर्षासाठी लोनवर करारबद्ध केले आहे.

ऑस्ट्रेलियातील ए-लीग स्पर्धेत खेळणाऱ्या न्यूकॅसल जेट्स संघाकडून डोनाची याला एफसी गोवाने २०२०-२१ मोसमासाठी संघात सामावून घेतले आहे. तो आगामी मोसमात इंडियन सुपर लीग आणि एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत गोव्यातील संघाचे प्रतिनिधित्व करेल. २७ वर्षीय डोनाची सेंटर-बॅक जागी खेळणारा भक्कम बचावपटू मानला जातो. ब्रिस्बेनमध्ये जन्मलेला हा अनुभवी बचावपटू एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत पाच वेळा खेळला आहे. 

एफसी गोवा संघातील डोनाची हा सहावा विदेशी खेळाडू आहे. त्यांचे बाकी पाच परदेशी खेळाडू स्पेनमधील आहेत. डोनाची हा आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) कोट्यातील खेळाडू असून एकंदरीत एफसी गोवा संघाने २०२०-२१ मोसमासाठी करारबद्ध केलेला तो नववा फुटबॉलपटू आहे. 

‘‘गोवा आणि भारतात येण्यासाठी मी आनंदित आहे. ही माझ्यासाठी फार मोठी संधी असून आव्हानही आहे. विजेतेपदाचे लक्ष्य बाळगलेला, तसेच आशियातील उच्च दर्जाच्या एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळणाऱ्या संघासाठी मी खेळेन. मला वाटतं, हा करार अगदी योग्यवेळी मिळाला आहे,’’ असे जेम्स डोनाची याने नव्या संघाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. ‘‘जेम्स आमच्यासाठी आवश्यक असलेला परिपूर्ण खेळाडू आहे. त्याची हवेतील क्षमता आणि ताकद यामुळे अतिरिक्त फायदा होईल,’’ असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी नमूद केले.

जेम्स डोनाची याच्याविषयी...

  •   ब्रिस्बेन रोअर संघातून खेळताना २०११-१२, २०१३-१४ मोसमात ए-लीग विजेता
  •   २०१७-१८ मोसमात मेलबर्न व्हिक्टरीकडून खेळताना ए-लीगमध्ये विजेतेपद
  •   ब्रिस्बेन रोअर संघातून युवा कारकिर्दीस सुरवात, २०१६ मध्ये मेलबर्न संघात दाखल
  •   २०१०-११ व २०११-१२ मोसमात ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम यूथ लीग खेळाडू
  •   २०१८ मध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दक्षिण कोरियातील के-लीगमधील जोन्नम ड्रॅगन्स संघात
  •   २०२०च्या सुरवातीस न्यूकॅसल जेट्सशी तीन वर्षांचा करार
  •   ऑस्ट्रेलियाच्या २० आणि २३ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व

संबंधित बातम्या