इंडियन सुपर लीग: गोव्यातील फुटबॉलपटूंचा सर्वव्यापी संचार

क्रीडा प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केवळ एफसी गोवा संघातूनच नव्हे, तर इतर संघातूनही गोव्यातील फुटबॉलपटू खेळताना दिसतील. साहजिकच राज्यातील खेळाडूंचा स्पर्धेत सर्वव्यापी संचार असेल.

पणजी: आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केवळ एफसी गोवा संघातूनच नव्हे, तर इतर संघातूनही गोव्यातील फुटबॉलपटू खेळताना दिसतील. साहजिकच राज्यातील खेळाडूंचा स्पर्धेत सर्वव्यापी संचार असेल.

आयएसएल स्पर्धेचा सातवा मोसम कोरोना विषाणू महामारीमुळे गोव्यातच खेळला जाईल. नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून तीन स्टेडियमवर बंद दरवाज्याआड स्पर्धेतील सामने रंगतील. चाहते नसले, तरी घरच्या मैदानावर खेळण्याचे समाधान स्पर्धेतील सर्व गोमंतकीय फुटबॉलपटूंना लाभेल.

एफसी गोवा वगळता, हैदराबाद एफसी संघाने गोव्यातील सर्वाधिक चार फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. यामध्ये अनुभवी ३२ वर्षीय बचावपटू आदिल खान, युवा २१ वर्षीय आघाडीपटू लिस्टन कुलासो, मध्यरक्षक साहिल ताव्होरा, गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी यांचा समावेश आहे. हे चौघेही खेळाडू सलग दुसरा मोसम हैदराबाद एफसीकडून खेळतील.

गतमोसमात ३० वर्षीय लेफ्टबॅक खेळाडू जेसेल कार्नेरो केरळा ब्लास्टर्सच्या मोहिमेत बचावफळीतील आधारस्तंभ ठरला होता. मोसमात तो सर्व १८ सामने खेळला होता. कोचीतील संघाने जेसेलशी सलग दुसऱ्या मोसमासाठी करार केला आहे. याशिवाय गोव्याचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सही केरळमधील संघात आहे.

आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा संघाचे सर्वाधिक ९७ सामने प्रतिनिधित्व केलेला २८ वर्षीय मंदार राव देसाई आगामी मोसमात मुंबई सिटी एफसीच्या जर्सीत दिसेल. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत मुंबई सिटीच्या मध्यफळीत उल्लेखनीय ठरलेल्या रॉलिन बोर्जिस याचा करारही सिटी ग्रुपचे व्यवस्थापन असलेल्या संघाने वाढविला आहे. मुंबई सिटीकडून रॉलिन गतमोसमात १५ सामने खेळला होता.

एटीके मोहन बागान संघात मध्यरक्षक ग्लॅन मार्टिन्स, ओडिशा एफसी संघात बचावपटू जॉर्ज डिसोझा, जमशेदपूर संघात बचावपटू जॉयनर लॉरेन्स, नॉर्थईस्ट युनायटेड संघात बचावपटू पोनिफ वाझ या गोमंतकीय फुटबॉलपटूंचा समावेश आहे. जॉयनर वगळता अन्य तिघांचा हा पहिलाच आयएसएल मोसम असेल.

संबंधित बातम्या