‘साळगावकर’चा माजी गोली करणजित सिंग चेन्नईयीनसाठी मोलाचा
‘साळगावकर’चा माजी गोली करणजित सिंग चेन्नईयीनसाठी मोलाचा

इंडियन सुपर लीग: ‘साळगावकर’चा माजी गोली करणजित सिंग चेन्नईयीनसाठी मोलाचा

पणजी: गोलरक्षक करणजित सिंग याच्याशी चेन्नईयीन एफसी संघाने २०२०-२१ मोसमासाठी करार वाढवून त्याच्या अनुभवास प्राधान्य दिल्याचे स्पष्ट आहे. गोव्यातील साळगावकर एफसीकडून खेळलेल्या या ३४ वर्षीय फुटबॉलपटूचे ज्ञान आगामी मोसमात दाेन वेळच्या आयएसएल  विजेत्या संघासाठी मोलाचे ठरेल.

साळगावकर एफसी संघात असताना २०१५ साली करणजित चेन्नईयीन एफसीकडून लोनवर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सर्वप्रथम खेळला. २०२०-२१ मध्ये तो या संघाचे सलग सहाव्या मोसमात प्रतिनिधित्व करेल. गतमोसमात त्याच्याकडे दुहेरी जबाबदारी होती. संघाचा गोलरक्षक आणि गोलरक्षक प्रशिक्षकपद त्याने पेलले. चेन्नईयीनने ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारत उपविजेतेपद मिळविले. आगामी मोसमात साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखाली तो निव्वळ गोलरक्षक या नात्याने कार्यरत असेल. भारतीय फुटबॉलमधील त्याचा दीर्घानुभव चेन्नईयीनसाठी लाभदायक असेल.

पंजाबमधील होशियारपूर येथे जन्मलेल्या करणजितने तेथील जेसीटी मिल्स संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर जुलै २०१० मध्ये साळगावकर एफसीशी करार केला. करणजितची गुणवत्ता भारताचे माजी प्रशिक्षक सुखविंदर सिंग यांनी हुडकली. जुलै २०११ मध्ये त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २०१० ते २०२० या कालावधीत साळगावकर, चेन्नईयीन एफसी व चेन्नई सिटी या संघाकडून करणजित सर्व स्पर्धांत मिळून एकूण १५५ सामने खेळला असून ४८ सामन्यांत एकही गोल स्वीकारला नाही. साळगावकर संघाकडून सहा वर्षे खेळल्यानंतर जुलै २०१६ मध्ये तो चेन्नईयीन संघात दाखल झाला. २०१६-१७ मोसमातील आय-लीग स्पर्धेत करणजित चेन्नई सिटीकडूनही लोनवर खेळला. कारकिर्दीत तो व्यावसायिक फुटबॉल मैदानावर दशकभरात १३,८९० मिनिटे खेळला आहे. 

कर्णधारपदाचा बहुमान
गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत करणजितने चेन्नईयीन एफसीचे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध नेतृत्व केले. चेन्नईयीनसाठी करणजितचे योगदान दिग्गज आहे. त्याला नेतृत्व करण्याची संधी देत संघाने अनुभवी गोलरक्षकाच्या कामगिरीचा बहुमान केला. देशातील आय-लीग, आयएसएल, सुपर कप, फेडरेशन कप, ड्युरँड कप स्पर्धेत, तसेच आशियाई पातळीवरील एएफसी कप स्पर्धेत साळगावकर व चेन्नईयीन एफसीकडून खेळला आहे. विजेतेपदाचा जल्लोष करणजित संघात असताना चेन्नईयीन एफसीने २०१५ व २०१७-१८ मोसमात आयएसएल स्पर्धा जिंकली. गतमोसमात उपविजेतेपद मिळविले. साळगावकरचे प्रतिनिधित्व करतानाही करणजितने यश मिळविले आहे. गोव्याचा संघ २०१०-११ मोसमात आय-लीग विजेता होता. त्याच्यापाशी आय-लीग स्पर्धेतील ८२, तर आयएसएल स्पर्धेतील ४९ सामन्यांचा अनुभव गाठीशी आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com