इंडियन सुपर लीग: आयएसएलमध्ये भविष्यात पदावनती, पदोन्नती नियम

पीटीआय
रविवार, 6 सप्टेंबर 2020

२०२४-२५ मोसमापासून अंमलबजावणी : कुशल दास

नवी दिल्ली: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतही २०२४-२५ मोसमापासून पदावनती आणि पदोन्नती नियमाची अंमलबजावणी होणार आहे. या नियमास सर्व भागधारकांनी मान्यता दिल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी शनिवारी दिली. 

आयएसएलमधील पदावनती नियमाच्या अंमलबजावणीपूर्वी २०२२ आणि २०२३ मध्ये आय-लीग विजेत्या संघास अव्वल श्रेणी स्पर्धा असलेल्या आयएसएलमध्ये थेट प्रवेश मिळेल, असेही दास यांनी नमूद केले. ईस्ट बंगाल संघाला गुंतवणूकदार मिळाल्याबद्दल आणि आयएसएल प्रवेशाची संधी उपलब्ध झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. 

येत्या दोन-तीन वर्षांत भारतीय फुटबॉलमध्ये पदावनती आणि पदोन्नती नियमाबाबत संरचित आराखडा असेल. येत्या दोन वर्षांतील आराखड्यानुसार, २०२२ पासून आय-लीग विजेत्या संघाला निव्वळ निव्वळ गुणवत्तेमुळे आयएसएलमध्ये थेट प्रवेश मिळेल, असे कुशल दास यांनी सांगितले. २०२४-२५ पासून पदोन्नती, पदावनती नियम लागून होईल, त्यानुसार आयएसएलमध्ये तळास राहणाऱ्या संघाची द्वितीय श्रेणीत पदावनती होईल आणि आय-लीग विजेत्याला आयएसएल स्पर्धेत पदोन्नती मिळेल. हा आराखडा साऱ्या भागधारकांनी मान्य केला आहे, असे महासंघाच्या सचिवांनी स्पष्ट केले.

मोहन बागान व ईस्ट बंगाल संघ आयएसएलमध्ये खेळावे असे आम्हाला नेहमीच वाटत असे. परंपरेकडे दुर्लक्ष करता येत नाही हे आम्ही मानतो, असे कुशल दास म्हणाले. मोहन बागान संघाचे एटीके संघात विलनीकरण झाल्यामुळे कोलकात्याच्या नावाजलेल्या संघाचा आयएसएल प्रवेश सुकर झाला आहे. नुकतेच श्री सिमेंट यांनी ईस्ट बंगाल संघात गुंतवणूक केल्यामुळे या संघालाही निविदा प्रस्तावाद्वारे आयएसएल प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे. मोहन बागान व ईस्ट बंगालच्या पाठीराख्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांचा पाठींबा असलेल्या दोन संघ आयएसएलमध्ये येणे फार मोठी घटना असेल, असे दास यांना वाटते.  

कोरोना विषाणू महामारीमुळे यंदाची आयएसएल स्पर्धा गोव्यातील तीन मैदानावर नोव्हेंबरच्या उत्तरार्धात आरोग्यविषयक कडक सुरक्षा उपाययोजनांसह खेळली जाणार आहे.

 

संबंधित बातम्या