इंडियन सुपर लीग: एफसी गोवाचा चिंग्लेनसाना सिंग हैदराबाद संघात

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 6 सप्टेंबर 2020

हैदराबाद एफसी चे डिफेन्डर चिंगलेनसाना सिंग

पणजी: भारतीय फुटबॉल मैदानावर साना या टोपणनावाने ओळखला जाणारा मणिपूरचा २३ वर्षीय बचावपटू कोनशाम चिंग्लेनसाना सिंग याने हैदराबाद एफसी संघाशी २०२१-२२ मोसमापर्यंत करार केला आहे. यापूर्वी तो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील तीन मोसम एफसी गोवा संघात होता.

सुब्रत पॉल आणि हालिचरण नरझारी यांच्यानंतर हैदराबाद एफसीने करारबद्ध केलेला साना हा तिसरा भारतीय फुटबॉलपटू आहे. हैदराबाद एफसीची नव्याने संघ बांधणी होत असून त्यांचा प्रस्ताव आकर्षक आहे. या संघाला वैभव मिळवून देण्यासाठी आपली मदत राहील, असे साना याने करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. साना हा देशातील अतिशय गुणवान युवा बचावपटू असल्याचे हैदराबाद एफसीचे सहमालक वरूण त्रिपुरानेनी यांनी नमूद केले. 

साना याने कारकिर्दीच्या प्रारंभिक टप्प्यात महिंद्र युनायटेड, एअर इंडिया, टाटा फुटबॉल अकादमीचे प्रतिनिधित्व केले. २०१५ साली त्याने शिलाँग लाजाँग एफसी संघातर्फे व्यावसायिक कारकिर्दीस सुरवात केली. या संघातून तो आय-लीग स्पर्धेतील दोन मोसम खेळला. २०१६ साली आयएसएल स्पर्धेत दिल्ली डायनॅमोजकडून खेळला. आयएसएलच्या २०१७ मधील निवड प्रक्रियेत एफसी गोवा संघाने साना याला निवडले. सलग तीन मोसम त्याने गोव्यातील संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१९ साली एफसी गोवाने सुपर कप जिंकला, त्या कामगिरीत साना याने मोलाचा वाटा उचलला होता. तो संघात असताना एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेत दोन वेळा उपांत्य, तर एक वेळ अंतिम फेरी गाठली. अशीच कामगिरी हैदराबादकडून खेळताना साध्य करण्याचे ध्येय साना याने बाळगले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर साना याने भारताचे १९, २२ व २३ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले हे. २०१६ साली त्याने भारताच्या सीनियर संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

 

संबंधित बातम्या