आयएसएल : खेळाडू कमी, तरीही ईस्ट बंगालला गुण

आयएसएल : खेळाडू कमी, तरीही ईस्ट बंगालला गुण
Copy of Gomantak Banner (16).jpg

पणजी : सामन्याच्या पूर्वार्धात रेड कार्ड मिळाल्यामुळे सुमारे तासभर दहा खेळाडूंसह खेळाडूनही ईस्ट बंगालने झुंजार प्रतिकार केला. प्रतिस्पर्ध्यांचा खेळाडू कमी असल्याची संधी चेन्नईयीनला साधता आली नाही, त्यामुळे सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गोलशून्य बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर सोमवारी झाला. चेन्नईयीन आणि ईस्ट बंगाल यांची ही स्पर्धेतील प्रत्येकी सहावी बरोबरी ठरली. पहिल्या टप्प्यातही त्यांच्यातील सामना गोलबरोबरीत राहिला होता. चेन्नईयीनचे आता 12 लढतीनंतर 15 गुण झाले आहेत. त्यांचा सहावा क्रमांक कायम आहे. ईस्ट बंगालचे 12 लढतीतून 12 गुण झाले आहेत. ते नवव्या क्रमांकावर कायम आहेत. एफसी गोवाविरुद्धही रेड कार्डमुळे एक खेळाडू कमी झाल्यानंतर ईस्ट बंगालने बरोबरी नोंदविली होती. कोलकात्यातील संघ आता सात सामने अपराजित आहे. गोलरक्षणात दक्ष ठरलेला ईस्ट बंगालचा देबजित मजुमदार सामन्याचा मानकरी ठरला.

ईस्ट बंगालला सामन्यातील 59 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले. 31व्या मिनिटास त्यांच्या अजय छेत्री याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. अगोदर 22व्या मिनिटास आणि पुन्हा एकदा चेन्नईयीनच्या अनिरुद्ध थापा याला धोकादायकरीत्या पाडल्याबद्दल रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी ईस्ट बंगालच्या बचावपटूवर कारवाई केली.

सामन्याच्या 23व्या मिनिटास चेन्नईयीनला आघाडीची संधी होती. सेटपिसेसवर एनेस सिपोविच याला चांगली संधी होती, पण त्याचे हेडिंग अचूक ठरू शकले नाही. विश्रांतीपूर्वी गोलरक्षक देबजित मजुमदार पूर्णपणे चकलेला असताना बचावपटू नारायण दासच्या दक्षतेमुळे चेन्नईयीनची आणखी एक संधी वाया गेली. सामना संपण्यास दोन मिनिटे असताना अँथनी पिल्किंग्टन याचा फ्रीकिक फटका गोलपोस्टवरून गेल्याने ईस्ट बंगालची संधी हुकली. त्यापूर्वी सामना संपण्यास सहा मिनिटे असताना गोलरक्षक देबजित मजुमदारने सुरेखपणे चेंडू अडविल्यामुळे चेन्नईयीनला आघाडीपासून दूर राहावे लागले. लाल्लियानझुआला छांगटे याचा ताकदवान फटका देबजितने डावीकडे झेपावत अडविला.

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेत यंदा चेन्नईयीनच्या 5, तर ईस्ट बंगालच्या 3 क्लीन शीट्स

- स्पर्धेतील 7 लढतीत ईस्ट बंगालच्या 5 बरोबरी व 2 विजय

- पहिल्या टप्प्यात चेन्नईयीन व ईस्ट बंगाल यांच्यात 2-2 गोलबरोबरी

- मोसमात चेन्नईयीनच्या 5, तर ईस्ट बंगालच्या 2 गोलशून्य बरोबरी
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com