‘आयएसएल’साठी परदेशी फुटबॉलपटूंना मंजुरी

पीटीआय
रविवार, 27 सप्टेंबर 2020

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या परवानगीसह गोव्यात येणार

नवी दिल्ली: गोव्यातील तीन मैदानावर येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत भाग घेणाऱ्या नऊ परदेशी फुटबॉलपटूंना केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यामध्ये ब्राझीलचे आठ, तर एक फिजी देशाचा खेळाडू आहे.

कोरोना विषाणू महामारी पार्श्वभूमीवर आयएसएल ही देशात होणारी पहिली मोठी क्रीडा स्पर्धा असेल. भारतात येणाऱ्या परदेशींत एकूण नऊ फुटबॉलपटू, तर एक प्रशिक्षक आहे. फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांच्यातर्फे स्पर्धा घेण्यात येत आहे. केंद्राकडून परवानगी मिळालेले परदेशी गोव्यातच होणाऱ्या स्पर्धापूर्व सरावात भाग घेतील. या खेळाडूंना भारतात जाण्यास त्यांच्या संबंधित सरकारकडूनही मंजुरी मिळाली आहे.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची परवानगी मिळालेल्या ब्राझीलय खेळाडूंत ओडिशा एफसीचा मार्सेलिन्हो व दिएगो मॉरिसियो, तसेच गोलरक्षक प्रशिक्षक रॉजेरियो रामोस या ब्राझीलियन्स समावेश आहे. याशिवाय बंगळूर एफसी व चेन्नईयीन एफसीचे प्रत्येकी दोघे, हैदराबाद एफसी व जमशेदपूर एफसी संघाच्या एका खेळाडूचा समावेश आहे. हे सर्व येत्या महिन्याच्या प्रारंभी ब्राझील येथून लंडनमार्गे हे खेळाडू गोव्यात दाखल होतील. भारताचे युनायटेड किंगडमसमेवत एअर बबल असल्याने हा प्रवास शक्य होत आहे. भारतात निघणाऱ्या विमानात बसण्यापूर्व ब्राझीलचे परवानगी मिळालेले खेळाडू, प्रशिक्षक लंडनमध्ये विलगीकरणात राहतील. सारेजण आरोग्य सुरक्षा शिष्टाचारविषयक आयएसएल मानक परिचालन पद्धतीचे (एसओपी) सक्तीने अवलंब करतील.

एटीके मोहन बागानचा रॉय कृष्णा याने आयएसएलसाठी फिजी देश सोडला आहे. तो न्यूझीलंजमध्ये दोन आठवड्यांच्या विलगीकरणात राहील, नंतर भारतात येण्यापूर्वी तीन निगेटिव्ह चाचण्या देईल.

सर्व खेळाडू गोव्यात दाखल झाल्यानंतर कोविड-१९च्या पाच चाचण्यांसह  १२ दिवसांच्या स्वयंअलगीकरणात राहतील. त्यानंतर ते आयएसएलच्या जैव सुरक्षा वातावरणात (बायो बबल) प्रवेश करतील. 

संघ गोव्यात दाखल
कोलकात्यातील एटीके मोहन बागान संघ बहुतांश खेळाडूंसह शनिवारी विमानाने गोव्यास रवाना झाला. हैदराबाद एफसीचा संपूर्ण भारतीय खेळाडूंचा संच हैदराबाद येथील सात दिवसांचे अलगीकरण संपवून बसमार्गे पणजीतील त्यांच्या आरक्षित हॉटेलात दाखल झाला आहे. या संघातील खेळाडू दोन वेगळ्या बसमधून आले आहेत. बंगळूर एफसी संघ कर्नाटकातील बळ्ळारी येथील त्यांच्या अकादमीत सराव करेल. एफसी गोवाचे सर्व भारतीय खेळाडू गोव्यात दाखल झाले असून ते सध्या स्वयंअलगीकरणात आहेत.

संबंधित बातम्या