इंडियन सुपर लीग: एफसी गोवा संघासाठी  नवा कर्णधार अपेक्षित

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आगामी मोसमात एफसी गोवा संघास नवा कर्णधार लाभण्याचे संकेत आहेत. नवे प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली लीग विनर्स शिल्ड विजेत्यांची यंदाची आयएसएल मोहीम गोव्यातच रंगेल.

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आगामी मोसमात एफसी गोवा संघास नवा कर्णधार लाभण्याचे संकेत आहेत. नवे प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली लीग विनर्स शिल्ड विजेत्यांची यंदाची आयएसएल मोहीम गोव्यातच रंगेल.

एफसी गोवाचा गतमोसमापर्यंतचा कर्णधार मंदार राव देसाई यंदा या संघाकडून खेळणार नाही. त्याने मुंबई सिटी एफसी संघाशी करार केला आहे. मंदार आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा संघाकडून ९७ सामने खेळला आहे. बहुतांश काळ त्याने संघाचे नेतृत्व केलेले आहे. याशिवाय गोव्यातील संघाच्या आघाडीफळीत सलग तीन मोसम खेळलेला फेरान कोरोमिनास आगामी मोसमात एफसी गोवा संघाच्या जर्सीत नसेल. आयएसएल स्पर्धेत ४८ गोल केलेल्या या हुकमी आघाडीपटूशी एफसी गोवाने करार वाढवलेला नाही. मंदार व कोरो हे दोन प्रमुख खेळाडू संघात नसल्यामुळे एफसी गोवा आगामी मोसमात नवा कर्णधार नियुक्त करणार हे निश्चित आहे.

नवा स्पॅनिश बचावपटू इव्हान गोन्झालेझ याच्याकडे एफसी गोवाचे कर्णधारपद येण्याचे संकेत आहेत. स्पेनमधील सेगुंडा विभागात कल्चरल लिओनेसा संघातर्फे खेळताना त्याने कर्णधारपद सांभाळले आहे. रेयाल माद्रिदच्या युवा संघातून खेळलेला हा ३० वर्षीय सेंटर-बॅक खेळाडू दीर्घानुभवी आहे. लिओनेसा संघाकडून तो शंभरपेक्षा जास्त लीग सामने खेळला आहे. स्पेनमधील खेळत असलेल्या संघाचा आपण चार मोसम कर्णधार होतो, आपणास आव्हान स्वीकारणे आणि संघाचे नेतृत्व करणे आवडते, असे एका मुलाखतीत सांगत गोन्झालेझ याने कर्णधारपदाबाबतचे आपले विचार स्पष्ट केले आहेत.  इव्हान गोन्झालेझ यापूर्वी फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला आहे. फेरॅन्डो हे लिओनेसा संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. एफसी गोवाच्या ३९ वर्षीय प्रशिक्षकांची शैली गोन्झालेझ याला पुरेपूर अवगत आहे. एफसी गोवाच्या बचावफळीतील धुरा आगामी मोसमात गोन्झालेझ याच्याकडेच असेल. 

संबंधित बातम्या