ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला विश्रांती

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली असून यात नवोदितांनी संधी देण्यात आली आहे. 

मुंबई- कोरोना महामारीनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज होणाऱ्या टीम इंडियाचा ३२ खेळाडूंचा (संघातील २८ खेळाडू तसेच सरावासाठी चार गोलंदाज) संघ जाहीर करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या कामगिरीला प्राधान्य देण्यात आले. 
रोहित शर्मा मांडीच्या दुखापतीतून सावरलेला नसल्याने त्याची निवड करण्यात आली नाही. त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी केएल राहुलची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

राहुलचे पुनरागमन

आयपीएलमध्ये फलंदाज आणि पंजाबचा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत असलेल्या केएल राहुलला कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यात त्याला कसोटी मालिकेच्यावेळी संघातून वगळण्यात आले होते.

गिलला प्राधान्य, श्रेयश दुर्लक्षित

शुभमन गिलला एकदिवसीय, ट्‌वेन्टी-२० सह कसोटी मालिकेतही संधी देण्यात आली; मात्र सध्या फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरचा कसोटीसाठी विचार करण्यात आला नाही. पृथ्वी शॉने मात्र आपले स्थान कायम राखले आहे.

चार राखीव गोलंदाज

ऑस्ट्रेलिया दौरा मोठा असून अचानक प्रमुख वेगवान गोलंदाजांना दुखापत झाली तर विलगीकरणाचे आव्हान लक्षात घेता लगेचच पर्याय तयार असावेत म्हणून कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पॉरेल आणि टी. नटराजन यांची राखीव गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. हे चारही गोलंदाज मुख्य संघाबरोबर ऑस्ट्रेलियास रवाना होणार आहेत. भारतीय संघ अमीरातीहूनच रवाना होईल.

रोहित आयपीएलमधूनही बाहेर?

पंजाबविरुद्धच्या सामन्यात मांडीचा स्नायू दुखावलेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार आयपीएलमधूनही बाहेर जाण्याचे संकेत मिळत आहेत. रोहित शर्माची दुखापत आणि त्याची प्रगती यावर बीसीसीआयची वैद्यकीय टीम लक्ष ठेवणार आहे, असे बीसीसीआयने संघनिवडीच्या वेळी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितची तंदुरुस्ती महत्त्वाची असल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यातून तो बाहेर गेल्यातच जमा 
आहे.

निवडलेला भारतीय संघ

ट्वेंटी- २० संघ-  विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती.
 एकदिवसीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मयांक अगरवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी संघ -विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा, रिषभ पंत (दोघेही यष्टीरक्षक), जसप्रीत बुमरा, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद. सिराज.
सरावासाठी गोलंदाज-  कमलेश नगरकोटी, कार्तिक त्यागी, ईशान पोरेल आणि टी. नटराजन.

संबंधित बातम्या