भारतीय युवा फुटबॉल संघाचे शिबिर गोव्यात शक्य

भारतीय युवा फुटबॉल संघाचे शिबिर गोव्यात शक्य
Indian youth football team camp possible in Goa

पणजी,

 सारं काही सुरळीतपणे जुळून आल्यास भारताच्या १६ वर्षांखालील मुलांच्या आणि १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघाचे सराव शिबिर गोव्यात होऊ शकते. कोविड-१९ महामारीमुळे सध्या युवा खेळाडू मैदानापासून दूर आहेत.

कोरोना विषाणू महामारीमुळे भारतीय फुटबॉलपटू मार्च महिन्यापासून मैदानावर सक्रिय नाहीत, तसेच त्यांचा सरावही रोखला गेला आहे. ही बाब अखिल भारतीय फुटबॉल महासंघास सतावत असून संघाच्या सरावासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोव्यातील कोविड-१९ विषयक नियमावलीत शिथिलता असल्याने या राज्यात सराव घेण्यास महासंघाचे प्राधान्य आहे.

युवा फुटबॉल संघाच्या सराव शिबिराविषयी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने अजून निर्णय घेतलेला नाही. माहितीनुसार, महासंघाला गोवा सरकारची कोविड-१९ विषयक एसओपी (प्रमाणित कार्यचालन पद्धती) मिळालेली आहे. नियोजनानुसार सारे काही पार पडल्यास जुलैअखेरीस संघाचे शिबिर सुरू होऊ शकते. काही दिवसांपूर्वी गोवा सरकारने पर्यटकांसाठी राज्यातील सर्व हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत गोव्यात नोंदित झालेल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २०३९ होती, त्यापैकी ८२४ रुग्ण उपचार घेत असून १२०७ रुग्ण बरे झाले आहेत, ८ जणांचा मृत्यू झालेला आहे.

अंमलबजावणी आवश्यक

गोव्यात युवा फुटबॉल संघाचे शिबिर घेताना महासंघाला खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल. प्रशासकीय पातळीवरील सर्व सोपस्कार पार पाडावे लागतील. सध्या गोव्यात शरीरसंपर्क खेळांचा सराव सुरू झालेला नाही. गोवा सरकारच्या एसओपीनुसार ४८ तास अगोदर कोविड चाचणी केलेला आणि बाधित नसलेला देशाच्या इतर राज्यातील प्रवासी राज्यात प्रवेश करू शकतो. कोविड चाचणीविना येणाऱ्यास पुढील चाचणी अहवाल मिळेपर्यंत सरकारमान्य विलगीकरणात राहावे लागते.

मुलांची स्पर्धा नोव्हेंबरमध्ये

येत्या नोव्हेंबरमध्ये बहारीन येथे नियोजित असलेल्या एएफसी १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी भारतीय मुलांचा संघ पात्र ठरला आहे. पुढील वर्षी भारतात १७ वर्षांखालील मुलींची विश्वकरंडक स्पर्धा होत असून यजमान या नात्याने भारतीय संघ खेळेल. मुलांच्या एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत गोव्याचा क गटात समावेश असून ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि उझबेकिस्तान हे बलाढ्य संघ गटात आहेत. स्पर्धेला २५ नोव्हेंबरपासून सुरवात होईल.

संपादन - तेजश्री कुंभार 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com