पंचवीस हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारताची कसोटी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

क्रिकेटविश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यातील मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल २५ हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये स्थान देण्यात येणार आहे.

मेलबर्न: क्रिकेटविश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यातील मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल २५ हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये स्थान देण्यात येणार आहे. तसे झाल्यास कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर क्रिकेट सामन्यासाठी प्रथमच प्रेक्षकांची उपस्थिती रहाणार आहे.

अमिरातीतील आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तीन एकदिवसीय, तीन ट्‌वेन्टी-२० आणि चार कसोटी सामने असा भरगच्च कार्यक्रम आहे. २७ नोव्हेंबर ते १९ जानेवारी असा दौऱ्याचा कार्यक्रम आहे.

कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून ॲडलेड येथे प्रकाशझोतातील सामन्याने येथे सुरू होणार आहे. त्याने मेलबर्न येथे बॉक्‍सिंग डे अर्थात २६ डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना सुरू होईल, याच सामन्याला २५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीचा प्रयत्न केला जाणार आहे. मेलबर्नच्या स्टेडियमची क्षमता लाखभराची आहे म्हणजेच एक चतुर्थांश स्टेडियम भरलेले दिसेल.

‘कोव्हिडमुक्त’ प्लान
व्हिक्‍टोरिया राज्य सरकार, मेलबर्न क्रिकेट क्‍लब आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया मिळून प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी ‘कोव्हिड मुक्त’ प्लान तयार करत आहेत. त्यामुळे प्रेक्षक तसेच क्‍लब सदस्यांना कसोटी सामन्याचा आनंद घेता येईल. कोव्हिडमुक्त आचारसंहितेनुसार आम्ही व्हिक्‍टोरिया सरकारबरोबर आखणी करत आहोत, अशी माहिती मेलबर्न क्रिकेटचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्‍स यांनी दिली.
महिलांचा वर्ल्डकप अंतिम सामना मेलबर्न क्रिकेटच्या याच मैदानावर ८३ हजार प्रेक्षकांच्या उपस्थिती भारत आणि ऑस्ट्रेलियात ८ मार्च रोजी महिलांचा विश्‍वकरंडक अंतिम सामना झाला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि क्रिकेटलाही ब्रेक लागला होता.
 

संबंधित बातम्या