'रिषभ पंत'चे चाहत्याला मिठी मारणे पडणार महागात ? या चुकीमुळे रोहित शर्मासह भारताचे पाच क्रिकेटपटू आयसोलेशनमध्ये

वृत्तसंस्था
रविवार, 3 जानेवारी 2021

भारतीय संघातील कसोटीपटूंनी मेलबर्नला जैवसुरक्षा नियमांचा भंग करत मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये भोजन केले. त्यामुळे या सर्व पाचही खेळाडूंना विलगीकरणात ठेवले असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले.

मेलबर्न :  भारतीय संघातील कसोटीपटूंनी मेलबर्नला जैवसुरक्षा नियमांचा भंग करत मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये भोजन केले. त्यामुळे या सर्व पाचही खेळाडूंना विलगीकरणात ठेवले असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. भारतीय क्रिकेट मंडळाने याबाबत काहीही टिप्पणी केली नसली तरी मंडळाने याबाबत चौकशी सुरु केल्याचे समजते. 
उपकर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील पाच खेळाडूंचे शॉपिंग सेंटरमधील रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याचे छायाचित्र ट्विट झाले. सिडनीत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तिथे कसोटीचे आयोजन किती सुरक्षित असेल याची चर्चा होत असतानाच हे छायाचित्र प्रसिद्ध झाले. रोहित शर्मा, रिषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ यांनी चॅडस्टोन शॉपिंग सेंटरमधील सिक्रेट किचन या चायनीज नूडल आणि बीबीक्‍यू रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे ऑस्ट्रेलियातील वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.

मेलबर्नमध्ये खाजगी रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या पाचही खेळाडूंना अलगीकरणात ठेवल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. त्यांना नियमांचे कसोशीने पालन करून सराव करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. भारतीय मंडळ तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया याबाबत चौकशी करीत आहे. ती पूर्ण होईपर्यंत दोन्ही संघांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे खेळाडू अलगीकरणात राहतील. त्यांना आपल्या संघासोबत प्रवास करता येणार नाही, असेही आवर्जून स्पष्ट करण्यात आले आहे.नवलदीप सिंग या भारतीय चाहत्याने खेळाडूंचा रेस्टॉरंटमधील  व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच खेळाडूंच्या खाद्यपदार्थांचे ११८.६९ ऑस्ट्रेलियन डॉलरचे बिलही आपण दिल्याचे सांगितले. त्याने सुरुवातीस पंतने आपल्याला आलिंगन दिल्याचे सांगितले; मात्र काही वेळाने सुरक्षित अंतराचे भान बाळगल्याचा दावा केला.

भारतीय मंडळाचे पदाधिकारी या व्हिडीओचा अभ्यास करीत आहेत. मंडळाने आतापर्यंत मौन बाळगले आहे. नियमावलीनुसार या खेळाडूंवर कारवाईचा अधिकार भारतास आहे. खेळाडूंना मुक्कामा व्यतिरिक्तच्या हॉटेलमध्ये खाण्यास मंजुरी असली तरी ते खुले रेस्टॉरंट असावे, भारतीय भेट दिलेल्या रेस्टॉरंटप्रमाणे बंदिस्त नसावे, असाही नियम असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. जैवसुरक्षा वातावरणात खेळाडू असल्यामुळेच राज्यांच्या सीमा बंद असल्या तरी त्यांना प्रवासास मंजुरी आहे. मालिकेतील चौथी कसोटी ब्रिस्बेनला (क्विन्सलॅण्ड) आहे. क्विन्सलॅण्ड सरकारचे न्यू साऊथ वेल्स (सिडनी) आणि व्हिक्‍टोरिया (मेलबर्न) परिस्थितीवर लक्ष आहे. क्विन्सलॅण्डने न्यू साऊथ वेल्सची सीमा बंद केली आहे, पण व्हिक्‍टोरियाबाबतचा निर्णय ८ जानेवारीस अपेक्षित आहे.

खरेदी करतानाही नियमभंग

नवलदीप यांनी खेळाडूंच्या शॉपिंगचीही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यातील एका छायाचित्रात यष्टिरक्षक पंत हा व्हॅलेंटिनो बॅगसह दिसत आहे. या ब्रॅंडचे स्टोअर खेळाडू ज्या मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये गेले होते, त्याच मॉलमध्ये आहेत. जैवसुरक्षा नियमांनुसार खेळाडूंना ऑनलाईन खरेदीसच परवानगी आहे. त्यांनी डिलीव्हरी स्वीकारताना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.

पुन्हा कोरोना चाचणीचा पर्याय

भारतीय संघव्यवस्थापन जास्त प्रश्‍न टाळण्यासाठी संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करू शकेल. बिग बॅश लीगमधील ख्रिस लिन आणि डॅन लॉरेन्स यांनी याच प्रकारे भंग केला होता. त्या वेळी कोरोना चाचणीनंतर त्यांना खेळवण्यात आले होते; मात्र त्यांना चाचणीचा अंतिम अहवाल आल्यावरही संघासोबत जल्लोष करण्यास किंवा एकत्रित चर्चेतील सहभागास मनाई करण्यात आली होती.

संघांचे सोमवारी प्रयाण
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरी कसोटी सिडनीत ७ जानेवारीपासून आहे. या कसोटीसाठी प्रतिस्पर्धी संघ सोमवारी मेलबर्नहून सिडनीस प्रयाण करतील. सिडनीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने तेथील निर्बंध जास्त कठोर आहेत.

तिसरी कसोटी होणाऱ्या सिडनीत...

  •      मास्कचा वापर जास्त सक्तीचा
  •      नाईट क्‍लबमधील नाचण्यावर निर्बंध
  •      जिम क्‍लास, विवाह, अंत्यविधी तसेच धार्मिक ठिकाणी उपस्थितांच्या ं       lसंख्येत घट
  •      कसोटीस आता ५० टक्के उपस्थित
  •      अर्थव्यवस्था कार्यरत ठेवतानाच कोरोना रोखण्याकडेही लक्ष देण्याचे धोरण

संबंधित बातम्या