INDvsENG: कालच्या बाचाबाचीनंतर बेन स्टोक्सने विराट कोहलीला पाठवलं माघारी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या मालिकेच्या चौथ्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी विराटला खाते न उघडता मैदानातून परतावे लागले.

अहमदाबाद: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अजूनही खेळामध्ये चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. गेल्या 15 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय शतकाची आस असलेल्या कोहलीच्या प्रतीक्षेत पुन्हा वाढ झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विराटकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती परंतु कर्णधार कोहली मैदानात टिकू शकला नाही.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या मालिकेच्या चौथ्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी विराटला खाते न उघडता मैदानातून परतावे लागले. पुजारा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटने आठ बॉल खेळून शून्यावर माघारी जावं लागलं. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर फॉक्सने विराटला झेलबाद केले. या विकेटसहच विराटने आपल्या नावावर अनेक अनपेक्षित रेकॉर्ड नोंदवून घेतले आहे.

विराटने आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कसोटीत शून्यावर बाद झाल्याने कोहलीने धोनीची बरोबरी केली आहे. इतकेच नव्हे तर विराटच्या कारकीर्दीतील ही दुसरी वेळ आहे जेव्हा तो कसोटी मालिकेत दोनदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी 2014 मध्ये, लियाम प्लंकेट आणि जेम्स अँडरसन यांनी त्याची विकेट घेतली होती, तर आता मोईन अली आणि बेन स्टोक्सने विराटची विकेट घेवून या मालिकेत त्याला खाते उघडू दिले नाही.

नोव्हेंबर 2019 मध्ये भारतीय कर्णधाराने ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरूद्ध आपले शेवटचे शतक ठोकले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत विराटला एकही शतक करता आले नाही. इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने सहा डावांमध्ये दोन अर्धशतके ठोकली आहेत आणि दोनदा शून्यावर बाद झाला आहे. आतापर्यंत त्याने अवघ्या 172 धावा केल्या आहेत. 

...म्हणून विराट कोहली भडकला होता बेन स्टोक्सवर  

दरम्यान टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज, इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात काल झालेल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर मोठी शाब्दिक चकमक झाली होती. बेन स्टोक्सने अपशब्द वापरण्याचा प्रयत्न केला, मात्र विराट कोहलीने मध्यस्थी करत प्रकरण व्यवस्थिपणे हाताळले असल्याचे मोहम्मद सिराजने सांगितले होते. खेळाच्या 12 व्या षटकातील अखेरच्या चेंडूनंतर स्टोक्सने मोहम्मद सिराजला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला होता. यावर विराट कोहली नाखूष दिसला व त्याने स्टोक्स बरोबर बोलल्याचे पाहायला मिळाले होते. विराट कोहली आणि बेन स्टोक्स यांना वेगळे करण्यासाठी मैदानातील अंपायर नितीन मेनन यांना हस्तक्षेप करावा लागला होता.

 

 

 

संबंधित बातम्या