INDvsENG: धावांचा डोंगर उभारूनही भारताचा बेरंग; इंग्लंडने उधळले विजयी रंग

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

तिनशेच्या पलिकडे मजल मारून होळी अगोदरच विजयाचे रंग उधळण्याची तयारी करणाऱ्या भारताच्या रंगाचा बेरंग इंग्लंडने केले.

पुणे: तिनशेच्या पलिकडे मजल मारून होळी अगोदरच विजयाचे रंग उधळण्याची तयारी करणाऱ्या भारताच्या रंगाचा बेरंग इंग्लंडने केले. भारताची 336 धावांची मोठी धावसंख्या त्यांनी सहा विकेट राखून पार केली आणि दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

के. एल. राहुलचे शानदार शतक आणि रिषभ पंत व हार्दिक पंड्या यांची स्फोटक फलंदाजी यामुळे भारताने 336 धावा केल्या होत्या. इंग्लंडने आत्तापर्यंत कधीही भारताविरुद्ध एवढी मोठी धावसंख्या पार करुन विजय मिळवलेला नाही, पण हा इतिहास त्यांनी बदलला.

जॉनी बेअरस्टॉने 112 चेंडूत 124 धावा केल्या. अर्धशतक करणाऱ्या जेसन रॉयसह त्याने शतकी सलामी देऊन विजयाचा पाया रचला होता. त्यानंतर बेन स्टोक्ससह वेगवान दीडशतकी भागीदारी करून इंग्लंडचा विजय निश्चित केला. स्टोक्सचे शतक एका धावाने हुकले. प्रतिस्पर्धी कर्णधार बदलला तरी नाणेफेकीचा कौल कोहलीच्या बाजूने लागला नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या संघाने दमदार विजय मिळवलेला आहे

शिखर धवन रीसी टोपलीला लवकर बाद झाला, तर रोहित शर्मा पाच खणखणीत चौकार मारून रंगात आला असताना सॅम करनच्या साध्या चेंडूवर झेल देऊन बसला. दोन सलामीवीर बाद झाल्यावर विराट कोहली आणि के एल राहुलची जोडी मैदानात जमली. दुसऱ्या सामन्याची खेळपट्टी फलंदाजीला जास्त पोषक असल्याने दोघांनी कोणताही धोका न पत्करता मोकळ्या जागेत चेंडू ढकलून पळून धावा काढायचा सपाटा लावला.

शतकी भागीदारी रचताना दोघांनी स्वत:ची अर्धशतके पूर्ण केली. विराट कोहलीला 35 धावांवर जोस बटलरकडून मिळालेल्या जीवदानाचा खूप मोठा फायदा घेता आला नाही. आदील रशीदने विराटला 66 धावांवर बाद केले तेव्हा त्याच जोस बटलरने झेल पकडला.

आय-लीग विजेतेपदासाठी तिरंगी चुरस; गोकुळम केरळा, ट्राऊ, चर्चिल ब्रदर्स संघ शर्यतीत 

विराट कोहली तंबूत परतल्यावर फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेत राहुलने धावगती वाढवण्याकडे लक्ष दिले. अर्थातच घणाघाती फलंदाजीकरता प्रसिद्ध असलेल्या रिषभ पंतने मोठे फटके मारून राहुलला उत्तम साथ दिली. 40 षटकांच्या अखेरीला भारतीय संघ 3 बाद 210 अशी चांगली अवस्था होती. शेवटच्या 10 षटकांत मोठ्या फटक्‍यांची गरज होती.

रिषभ पंतचा तडाखा

रिषभ पंतने जाडजूड बॅटचा चाबकासारखा वापर करत रिषभने गोलंदाजांना फोडून काढत 28 चेंडूत अर्धशतक ठोकताना 4 षटकार मारले. तावडीत सापडलेल्या टॉम करणच्या एका षटकात 22 धावा दिल्या. राहुलचे लाजवाब शतक आणि पंत बरोबरीची 67 चेंडूतील शतकी भागीदारी एकत्रच साजरी झाली. शतकानंतर राहुल बाद झाल्याचा संघाला फायदा झाला असेच म्हणावे लागेल. कारण नंतर आलेल्या हार्दिक पंड्याने षटकारांची बरसात केली. 40 चेंडूत 77 धावा काढताना रिषभ पंतने 7 षटकार मारले. 

संक्षिप्त धावफलक 
भारत: 50 षटकांत 6 बाद 336(रोहित शर्मा 25-25 चेंडू, 5 चौकार, शिखर धवन 4, विराट कोहली 66-79  चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, केएल राहुल 108 -114 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार, रिषभ पंत 77-40 चेंडू, 3 चौकार, 7 षटकार, हार्दिक पंड्या 35-16 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, रीस टॉपली 8-0-50-2, टॉम करन 10-0-83-2). 

पराभूत वि.इंग्लंड :43.3  षटकांत 4 बाद 336 (जेसन रॉय 55-52 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, जॉनी बेअरस्टॉ 124-112 चेंडू, 11 चौकार, 7 षटकार, बेन स्टोक्स 99-52 चेंडू, 4 चौकार, 10 षटकार, प्रसिद्ध कृष्णा 10-0-58-2)

संबंधित बातम्या