ऑलिंपिक अनिश्चित असतानाही भारतीय संघास आयनॉक्सचा पुरस्कार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

चिनी पुरस्कर्त्यांबाबत आयओए अनिर्णितच

मुंबई: टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघास आयनॉक्‍सचा पुरस्कार लाभला असल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने जाहीर केले; पण ली निंग या चीनच्या पुरस्कार कंपनीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही; मात्र त्याच वेळी ऑलिंपिक अनिश्‍चित असतानाही भारतीय संघास पुरस्कर्ते मिळवण्यात भारतीय ऑलिंपिक संघटनेस यश आले आहे. 

भारतीय ऑलिंपिक संघटना आणि आयनॉक्‍स यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार आयनॉक्‍स भारतीय खेळाडूंच्या ऑलिंपिक मोहिमेस प्रोत्साहन देईल. आयनॉक्‍स देशभरातील आपल्या मल्टिप्लेक्‍सद्वारे हे करणार आहेत. त्यांनी यापूर्वी टेबल टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटन, ॲथलेटिक्‍स, बास्केटबॉल, क्रिकेटच्या स्पर्धा तसेच लीगना या प्रकारचा पुरस्कार दिला आहे. 

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय संघास मिळालेला हा पुरस्कार खूपच मोलाचा आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष दूर असताना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकेल, असेही मानले जात आहे. 

लि निंगबाबतचा निर्णयच नाही
चीन आणि भारत सीमेवर संघर्ष सुरू झाल्यावर चीनमधील कंपन्यांबरोबर नाते तोडण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. लि निंग हे भारतीय खेळाडूंच्या क्रीडा साहित्याचे पुरस्कर्ते आहेत. आता आयनॉक्‍ससह करार होताना लि निंगच्या कराराबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी स्पष्ट केले. आयनॉक्‍स आणि लि निंगचा पुरस्कार या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही पुरस्कारांचा एकमेकांशी संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या